Wed, Nov 21, 2018 13:56



होमपेज › Kolhapur › साडेपाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना नोकरी

साडेपाच हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना नोकरी

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 20 2018 1:43AM



कोल्हापूर : प्रतिनिधी

एकाचवेळी 5 हजार 634 विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी शनिवारी शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित महारोजगार मेळाव्यात उपलब्ध झाल्या. देशभरातील नामवंत 122 कंपन्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला. या मेळाव्यासाठी 23 हजार विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावून उच्चांक निर्माण केला. यशस्वी मुलाखत झालेल्या विद्यार्थ्यांनी नोकरी मिळाल्याच्या समाधानाने मित्रांसमवेत कॅम्पस्मध्ये आनंदोत्सव साजरा केला. या मेळाव्यास मुलींची संख्या लक्षणीय दिसून आली. 

शिवाजी विद्यापीठाचे कौशल्य व उद्योजकता विकास केंद्र आणि मध्यवर्ती रोजगार कक्ष व महाराष्ट्र शासनाचा विद्यापीठ कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्‍त विद्यमाने हा महारोजगार मेळावा आयोजित केला होता. 

असा झाला महारोजगार मेळावा..
विद्यापीठात आज माहिती तंत्रज्ञान, बी.पी.ओ., सेवा क्षेत्र, एच.आर., विपणन, विक्री, बँकिंग, फायनान्स विमा, विविध वित्तीय संस्था, वस्त्रोद्योग, टेलिकॉम, अभियांत्रिकी आदींसह रिक्रूटिंगच्या क्षेत्रात काम करणार्‍या सुमारे 122 कंपन्यांनी विविध पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. काही कंपन्यांनी लेखी तसेच ऑनलाईन परीक्षाही घेतल्या. या पदांसाठी यापूर्वीच दहा हजारांहून अधिक उमेदवारांनी ऑनलाईन व ऑफलाईन स्वरूपात नावनोंदणी केलेली होती.

विद्यार्थ्यांच्या गर्दीचा उच्चांक
शनिवारी सकाळपासूनच विद्यापीठाच्या लोककला केंद्रात स्पॉट नोंदणीसाठी उमेदवारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने सुमारे 50 नोंदणी कक्ष सुरू केले होते. त्यामुळे उमेदवारांना नोंदणी करणे सोयीचे झाले. या मेळाव्यासाठी एकूण 23 हजार 769 उमेदवारांनी नोंदणी केली. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांना विविध कंपन्या व त्यांच्या मुलाखत कक्षाची माहिती पत्रकाद्वारे तसेच ठिकठिकाणी माहिती फलकांद्वारे उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांना थेट मुलाखतीच्या ठिकाणी जाता आले. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, वनस्पतीशास्त्र, भूगोल, मानव्यविद्या इमारत, वि. स. खांडेकर भाषा भवन, गणित आणि तंत्रज्ञान अशा नऊ विविध अधिविभागांमध्ये विविध कंपन्यांसाठी क्षेत्रनिहाय मुलाखतींची व्यवस्था करण्यात आल्यामुळे एकाच ठिकाणी गर्दी न होता रोजगार मेळाव्याची प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली. त्याचप्रमाणे लोककला केंद्रात तीस विविध संस्थांनी स्टॉल्स उभारून त्या ठिकाणी विविध 50 कौशल्ये सुमारे 6500 उमेदवारांना मोफत प्रदान केली.

सकाळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते रोजगार व कौशल्य महामेळाव्याचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, शैक्षणिक सल्‍लागार डॉ. डी.आर. मोरे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव, विद्यापीठाच्या कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक व अधिष्ठाता डॉ. ए. एम. गुरव आदींसह अधिसभा, व्यवस्थापन परिषद व विद्या परिषदेचे सदस्य उपस्थित होते.

उद्घाटनानंतर कुलगुरू डॉ. शिंदे यांनी लोककला केंद्रातील विविध कौशल्य प्रदान स्टॉल्सची फिरून पाहणी केली. यावेळी नोंदणीसाठी उपस्थित असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींशीही त्यांनी संवाद साधला. यानंतर मुलाखतीची व्यवस्था करण्यात आलेल्या विविध अधिविभागांना कुलगुरू डॉ. शिंदे व प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांनी भेट देऊन त्या ठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. रोजगार प्रदात्या कंपन्यांच्या प्रतिनिधींचे स्वागत केले.