होमपेज › Kolhapur › शिवाजी पूल अपघात : वाहन तांत्रिकदृष्ट्या फिट

शिवाजी पूल अपघात : वाहन तांत्रिकदृष्ट्या फिट

Published On: Jan 31 2018 2:03AM | Last Updated: Jan 31 2018 1:12AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

अपघातातील अपघातग्रस्त टेेपो ट्रॅव्हलरने मोठे वळण घेतल्याने शिवाजी पुलावर प्रजासत्ताक दिनी अपघात झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिस दलातील अशा प्रकारच्या वाहनाद्वारे प्रात्यक्षिक घेऊन असे वळण होऊ शकते का याचा तपास करण्यात आला. या प्रात्यक्षिकात असे वळण चालक घेऊ शकतो असे सिद्ध झाले आहे. आरटीओ अधिकार्‍यांनी मंगळवारी पुन्हा एकदा अपघातग्रस्त वाहनाची पुनर्तपासणी केली असून तांत्रिकद‍ृष्ट्या वाहन फिट असल्याचा अभिप्राय नोंदविला आहे. परिणामी चालकाच्या बेदरकार ड्रायव्हिंगमुळे अपघात झाल्याचे स्पष्ट होते. 

प्रजासत्ताकदिनी रात्री झालेल्या अपघातात तेराजणांचा बळी गेला आहे. यामुळे पर्यायी पुलाचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. या अपघाताचे नेमके कारण शोधून काढण्यासाठी पोलिस आणि आरटीओ विभागाने कंबर कसली आहे.  अपघातात टेंपो ट्रॅव्हलर्स हे वाहन होते. अपघाताची चित्रफित पाहता. अपघातग्रस्त वाहनाने मोठे वळण घेतल्याने कठडा तोडून वाहन नदीत कोसळले आहे. नवीन वाहनात असा अचानक तांत्रिक बिघाड होऊ शकतो का? अचानक तांत्रिक बिघाडाने अथवा चालकाच्या चुकीने असे मोठे वळण होऊ शकते का? याचा शोध घेण्यात आला. यासाठी पोलिस दलात असणारे नवीनच टेंपो ट्रॅव्हलर्स हे वाहन प्रात्यक्षिकासाठी वापरण्यात आले. मोटर वाहन निरीक्षक प्रशांत  साळी यांनी स्वत: हे वाहन चालविले. यावेळी 20 ते 40 कि.मी. या वेगाने असे वळण घेऊन अपघातावेळी असे वळण घेतले असल्याची शक्यता व्यक्‍त झाली आहे. आरटीओ डॉ. डी. पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. एस. टी. अल्वारीस मोटार वाहन निरीक्षक प्रशांत साळी ए. के. पाटील यांनी हे प्रात्यक्षिकांत भाग घेतला. पोलिस मुख्यालयातील मोटार वाहन विभागात झालेल्या प्रात्यक्षिकावेळी पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्यासह तपास अधिकारी साहायक पोलिस आरती नांद्रेकर उपनिरीक्षक युवराज आठरे उपस्थित होते. 

आरटीओ अधिकार्‍यांनी अपघातग्रस्त वाहनाची मंगळवारी पुनर्तपासणी केली. या तपासणीत वाहनाचे स्पीड्यामीटर 20 कि.मी.ला लॉक झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये हे वाहन तांत्रिकदृष्ट्या फिट असल्याचे मत नोंदविले आहे. त्यामुळे मानवी चुकीमुळे हा अपघात झाल्याचे मत नोंदविले आहे.