Thu, Jun 27, 2019 15:43होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : शिवाजी पूल हलक्या वाहनांसाठी खुला

कोल्हापूर : शिवाजी पूल हलक्या वाहनांसाठी खुला

Published On: Jul 22 2018 1:01AM | Last Updated: Jul 22 2018 12:55AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पंचगंगा नदी धोका पातळीवर गेल्याने सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला शिवाजी पूल शनिवारी सकाळी हलक्या वाहनांसाठी खुला करण्यात आला. चार दिवसांनंतर पुलावरून वाहतूक सुरू झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूल खुला करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. दरम्यान, शनिवारी पावसाने चांगली उघडीप दिली.

गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. आज अधूनमधून कोसळणार्‍या सरी वगळता पावसाने पूर्ण विश्रांती घेतली. काही काळ कडकडीत ऊनही पडले होते. काही काळ ऊन-पावसाचाही खेळ रंगला होता. पावसाच्या उघडिपीमुळे नद्यांच्या पातळीत घट होऊ लागली आहे. पंचगंगा धोक्याच्या पातळीखाली आली. रविवारपर्यंत इशारा पातळीखाली पंचगंगेचे पाणी जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील पूरस्थिती निवळत चालली असून, शनिवारी दिवसभरात तीन बंधार्‍यांवरील पाणी उतरले. अद्याप 57 बंधारे पाण्याखाली आहेत, त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे.

शिवाजी पूल दुचाकी आणि तीनचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला. कोल्हापूर-पन्हाळा मार्गावरील पाणी ओसरले आहे. यामुळे पूल चारचाकी वाहनांसाठीही सुरू करावा, अशी मागणी नागरिकांनी केली. याबाबत जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग विभागाला नागरिकांनी निवेदनही दिले. दरम्यान, अद्याप रस्त्यालगत पाणी असल्याने सर्व वाहनांसाठी पूल खुला करण्यात आलेला नाही. कमी होत जाणारी पाणी पातळी पाहून निर्णय घेतला जाईल, असे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. कसबा बावडा-शिये मार्गावरील पाणीपातळी कमी झाल्याने दुपारनंतर यावरील सर्व प्रकारची वाहतूक सुरू झाली.

राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले आहेत. त्यातून 4456 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दूधगंगा धरणातूनही चार हजार क्युसेक विसर्ग सुरूच आहे. वारणेतून 12 हजार 41 क्युसेक विसर्ग होत आहे. कोयना धरणातून सकाळी 18 हजार 163 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तो दुपारी आणखी वाढवून 24 हजार 246 क्युसेक इतका करण्यात आला. वारणा, कोयना धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे कृष्णेच्या पातळीत काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 19.54 मि.मी.पावसाची नोंद झाली. गगनबावड्यात सर्वाधिक 45.50 मि.मी. पावसाची नोंद झाली. शाहूवाडी व आजर्‍यात प्रत्येकी 31 मि.मी., राधानगरीत 25.83 मि.मी., भुदरगडमध्ये 22.40 मि.मी., पन्हाळ्याला 20.14 मि.मी., चंदगडमध्ये 16.66 मि.मी., कागलमध्ये 12.57 मि.मी., करवीरमध्ये 12 मि.मी., हातकणंगलेत 5.50 मि.मी., तर शिरोळ तालुक्यात 2.57 मि.मी. पाऊस झाला. धरण क्षेत्रातही पावसाचा जोर काहीसा कमी झाला. गेल्या 24 तासांत पाच धरण परिसरात अतिवृष्टी झाली.