Thu, Apr 25, 2019 03:29होमपेज › Kolhapur › शिवाजी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण

शिवाजी पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण

Published On: Feb 11 2018 1:55AM | Last Updated: Feb 10 2018 11:18PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

ब्रिटिशकालीन शिवाजी पुलावर प्रजासत्ताकदिनी झालेल्या अपघाताच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग विभागाने खासगी एजन्सीतर्फे या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट केले. गेले चार दिवस सुरू असणारे ऑडिटचे काम शनिवारी पूर्ण झाले. या ऑडिटचा अहवाल पाच ते सात दिवसांत संबंधित कंपनी राष्ट्रीय महामार्ग विभागास सादर करणार आहे. आजपासून शिवाजी पूल वाहतुकीस खुला झाला आहे.
दरम्यान, या ऑडिटसाठी शिवाजी पुलावरील वाहतूक दुपारी दोन ते सायंकाळी साडेचारपर्यंत बंद ठेवण्यात आली. ऑडिटचे काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच साडेचार वाजता वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलास 140 वर्षे पूर्ण झाली आहेत. या पुलास पर्यायी पूल बांधण्यात येत असून, काम अर्धवट रखडले आहे. त्यामुळे शिवाजी पुलावरूनच वाहतूक सुरू आहे. प्रजासत्ताकदिनी या पुलावर अपघात होऊन 13 जणांचा बळी गेला आहे. या अपघाताने खडबडून जागे झालेल्या  यंत्रणेने या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू केले. बुधवारपासून ऑडिटचे काम सुरू आहे. ध्रुव कन्स्लटन्सीतर्फे स्ट्रकवेल डिझायनर्स या कंपनीतर्फे हे ऑडिट सुरू आहे. जयंत कदम, जितेंद्र भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली पथकाने दोन दिवसात एन्डोस्कोपी, शनिवारी अंतिम टप्प्यातील ग्राऊंड पेनिस्ट्रेशन रडार (जीपीआर) या मशीनद्वारे जीपीआर सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेमध्ये जीपीआर मशीनला छोटा लॅपटॉप जोडण्यात आलेला असून, या मशीनला विविध क्षमतेच्या अँटेनांच्या सहाय्याने पुलावरील रस्त्याखालील भरावाची चाचणी घेण्यात आली. अपघातामुळे या भरावास काही धोका झाला आहे का? हे मशीन पुलावरून  दोन्ही बाजूने आणि आडवे-तिडवे असे सर्व बाजूंनी फिरवून आतील भागाचे चित्रण करण्यात आले. इलेक्ट्रो मॅग्नेटिक रेडिओ फ्रिक्वेन्सी वेव्हज्च्या सहाय्याने भरावाची चाचणी घेण्यात आली. भरावाची जाडी किती आहे, दोन दगडांमध्ये पोकळी निर्माण झाली आहे का, भरावात कुठे पोकळी निर्माण झाली आहे, याची माहिती घेण्यात आली. मेजर ब्रिज इन्स्पेक्शन युनिट या अत्याधुनिक सुविधांनीयुक्त मोबाईल व्हॅनद्वारे पुलाची प्रोफाईल मॅनेजमेंट, जीपीआर टेस्ट (रडार इन्स्पेक्शन) आणि इन्डोस्कोपी अशा तीन टप्प्यात तपासणी करण्यात आली.

दुपारी दोन वाजता ऑडिटचे काम सुरू झाले. दोन ते चार असे दोन तास हे काम सुरू होते. या चाचणीवेळी नॅशनल हायवे विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे, उपअभियंता व्ही. जी. गुळवणी आणि संपत आबदार, सहायक अभियंता प्रशांत मुंगाटे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. 

राजाराम बंधार्‍यावरून वाहतुकीची मोठी वर्दळ

दरम्यान, या चाचणीसाठी प्रशासनाने दुपारी दोन ते चार या वेळेत शिवाजी पुलावरून होणारी वाहतूक बंद ठेवली होती. यामुळे पंचगंगा नदीवरील राजाराम बंधार्‍यावरून ही वाहतूक सुरू करण्यात आली. या वेळेत राजाराम बंधार्‍यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू राहिल्याने या बंधार्‍यावरही वाहतुकीची मोठी कोंडी झाली. दुपारी साडेचार वाजता शिवाजी पुलावरून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.