Sun, Feb 23, 2020 15:23होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : तर शिरढोणमधील जलसमाधी घेणार

कोल्हापूर : तर शिरढोणमधील जलसमाधी घेणार

Published On: Aug 18 2019 12:52PM | Last Updated: Aug 18 2019 11:46AM
कुरुंदवाड: प्रतिनिधी

शिरढोण ता.शिरोळ गावाला महापूराचा चारही बाजूंनी वेढा पडला. लोकवस्ती व शेतातील पिके पूर्ण पाण्याखाली गेली. महापुराने ग्रामस्थांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असताना प्रशासन मदत देण्याबाबत दुर्लक्ष करत आहे. प्रशासनाने शिरढोण गाव शंभर टक्के पूरग्रस्त जाहीर करावे या मागणीसाठी सरपंच बिल्किश मुजावर, शिरढोण बचाव कृती समितीचे अध्यक्ष सुरेश सासणे,विश्वास बालिघाटे याच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी गाव बंद करून गाव चावडी कार्यालयासमोर उपोषणाला सुरवात केली आहे.

दरम्यान, प्रशासनाने गावातील ६८६ इतक्या ग्रामस्थांना सानुग्रह अनुदान दिले आहे. शिरढोण गाव शंभर टक्के पूरग्रस्त जाहीर न केल्यास १९ तारखेला शाहीर बाणदार, शुभम गुरवाण, उमेश हवगुडे, उमेश सासणे, शुभम गुरवान, प्रमोद कांबळे यांनी अन्यथा जलसमाधी घेऊ, असा इशारा दिला आहे. 

पंचगंगा नदीला महापूर आल्यानंतर शिरढोण कुरुंदवाड गावचा संपर्क तुटला. पुराचे पाणी गावात शिरून अनेक घरांची पडझड झाली आहे. अनेक जनावरांना जलसमाधी मिळाली आहे. पुरामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाली आहेत. या गावात ३ हजार ४७३ मिळकतधारक आहेत. तर ८४३ हेक्टर शेती आहे. 

प्रशासनाने फक्त ६८६ मिळकतधारकांना पाच हजार रुपयांचा पहिला हप्ता देण्यात आला आहे. शेतीबाबत कोणतीच भूमिका घेतलेली नाही. अद्यापही दिलासादायक मदत गावाला मिळाली नाही. शिरढोण गावाकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. शिरढोण गाव पूरग्रस्त आहे १०० टक्के पूरग्रस्त जाहीर करून ग्रामस्थांना पूरग्रस्त मदत मिळावी  अन्यथा आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशाराही कृती समितीचे अध्यक्ष सुरेश सासणे यांनी  दिला आहे.