Mon, Jun 17, 2019 15:00होमपेज › Kolhapur › शशी कपूर यांचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे नाते

शशी कपूर यांचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे नाते

Published On: Dec 05 2017 1:47AM | Last Updated: Dec 05 2017 12:51AM

बुकमार्क करा

शशी कपूर गेली तीन वर्षे वजनवाढीमुळे  बिछान्यावर पडूनच होते. त्यांचे हे रूप पाहतानाच डोळ्यासमोर तरळून गेले ते देखणे, सडपातळ रूप, जे 1970 च्या सुमारास कोल्हापूरला मुमताजसोबतचे ‘चोर मचाये शोर’च्या चित्रीकरणावेळचे! ‘जब जब फुल खिले’ व ‘अभिनेत्री’ हे सिनेमे रौप्यमहोत्सवी ठरल्याने त्यावेळी नंदा व शशी कपूरवर चित्रीत ‘एक था गूल और एक थी बुलबुल’ हे काश्मीरच्या रम्य वनश्रीच्या पार्श्‍वभूमीवरचे गीत तरुण-तरुणींच्या ओठी होते. त्यामुळे ‘चोर मचाये शोर’च्या वेळी (हा चित्रपट मराठी ‘आम्ही जातो आमुच्या गावा’वरून घेतला होता.) ते सडपातळ गोजिरे रूप पन्हाळा येथे व टेंबलाई टेकडीवर पाहताना भान हरपून गेले.

सर्व कलाकार लंचमध्ये डबे उघडून मटण-बिर्याणीवर ताव मारताना पाहून शशी मात्र स्वतःच्या डब्यातील काकडी, टोमॅटो व बीटच्या चकत्या-सॅलड खात होता. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’तील अंजली जशी तारकचे वजन वाढू नये म्हणून सॅलडस् व विविध प्रकारचे रस देत असते, तशीच जेनिफर कपूर- शशीची पत्नी त्याला डब्यातून सॅलडस् व ज्यूस द्यायची. शूटिंग पॅकअप झाले की, कधी तो हॉटेलवर जायचा, तर कधी गुरू भालजीबाबांना भेटण्यासाठी ‘जयप्रभा स्टुडिओ’त यायचा. वडील पृथ्वीराज कपूर व भाऊ राज कपूर दोघांनीही बाबांच्या ‘वाल्मीकी’मध्ये काम केल्याने राज कपूरही कोल्हापूरला भालजींना स्टुडिओत जाऊन भेटून त्यांच्या पायाशी बसून गप्पा मारायचा.

‘चोर मचाये शोर’ पाहताना कोल्हापूरची लोकेशन्स, शूटिंगच्या वेळच्या आठवणी डोळ्यांसमोरून गेल्या. त्यानंतर शशी कपूर नात करिना कपूरसह कोल्हापुरात आले 4 जानेवारी 1995 रोजी. भाऊ राज कपूर ज्याने ‘आवारा’तून बाल शशीला, तर ‘श्री’मधून शशी, रणधीर व ऋषीला प्रथम पडद्यावर आणले. त्यांच्या संभाजीराव पाटील या कोल्हापूरच्या चाहत्याने राज कपूर यांच्या पुतळा अनावरणप्रसंगी त्यांना आमंत्रित केले, तेव्हा ‘हिरो’गिरी संपली होती. मनसोक्‍त खाण्यामुळे थोडे ते आडवे सुटले होते; पण चेहर्‍यावर तेच मिठ्ठास हास्य होते. पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते झाल्यावर ‘श्री 420’मधील तो ट्रँपच्या अवतारातील भावाचा बस्ट पुतळा पाहून तिथे उपस्थित शिल्पकार प्रभाकर जाधव यांचे कौतुक केले. ज्या वाशी नाक्याच्या उतारावर ‘मेरा जुता है जपानी’ चित्रीत झाले त्याच कोपर्‍यावर हे आकारलेले भावाचे शिल्प पाहून त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले. त्याच भारावलेल्या अवस्थेत त्यांनी भावाला वंदन केले व संभाजीरावांच्या रसिकतेला दाद दिली. सोबत करिनाला पाहण्यासाठी तरुणांची गर्दी होती; पण आम्ही गेलो होतो ते मिठ्ठास हास्य ओठावर खेळवणार्‍या शशी कपूरसाठी.

याच त्यांच्या कोल्हापूरशी निगडित शेवटच्या आठवणी. आज 79 व्या वर्षी ते गेल्यावर मन तुलना करू लागले. ‘चोर मचाये शोर’मधील नाजूक शशी, पुतळ्याच्या उद्घाटनाचे वेळेचा प्रौढ, किंचित स्थूल शशी अन् अलीकडे बिछान्यावर पडून हालचालही अशक्य झालेले शशी! नियतीचा खेळ अजब आहे, हेच खरे!

कोल्हापूरवर कपूर घराण्याचे प्रेम 

अभिनेते शशी कपूर यांचे कोल्हापूरशी विशेषत: भालजी पेंढारकर यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. कोल्हापुरात चित्रीकरणानिमित्त ते येत होते. मुंबईत आर. के. स्टुडिओ उभारण्यात भालजी पेंढारकर यांचे योगदान असल्याचे शशी कपूर सांगत होते. 

कलेची पंढरी असणार्‍या कोल्हापुरात पृथ्वीराज कपूर यांचे जयप्रभा स्टुडिओत चित्रीकरण असायचे. यानिमित्ताने शशी कपूर यांचे बालपण काही काळ कोल्हापुरात गेले. राज कपूर यांच्या चेहर्‍यावर पहिला मेकअप याच कोल्हापुरात ‘वाल्मीकी’ चित्रपटाच्या निमित्ताने केला गेला. राज कपूर यांनी नारदाची भूमिका साकारली होती. यावेळी शशी कपूर चित्रीकरणस्थळी असाचये. त्यांना अनेकवेळा भालजी स्वत: आपल्या कडेवर घेऊन फिरायचे. 

सप्टेंबर 1993 मध्ये आर. के. फिल्मस्ची निर्मिती असलेल्या ‘प्रेम ग्रंथ’ चित्रीकरणाची काही द‍ृश्ये व गाणे कोल्हापुरात ऋषी कपूर, माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रीत  करण्यात आले होते. यानिमित्ताने शशी कपूर, रणधीर कपूर, कृष्णा कपूर कोल्हापुरात आले होते. तेव्हा भालजी पेंढारकर यांच्या प्रकृतीची चौकशी  करण्यासाठी ते जयप्रभा स्टुडिओत गेले.  बाबांना पाहून शशी कपूर यांना गहिवरून आले होते. यावेळी शशी कपूर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी राज कपूर यांच्या बायोग्राफीची प्रत त्यांनी भालजींना दिली. 1994 साली मराठी चित्रपट व्यवसायाच्या अमृत महोत्सवानिमित्त अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने केशवराव भोसले नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमाचे ते प्रमुख पाहुणे होते. यावेळी त्यांनी कोल्हापूरवर कपूर घराण्याचे प्रेम असल्याचे  सांगितले होते. 

- प्रा. प्रभाकर तांबट