Fri, Nov 16, 2018 03:23



होमपेज › Kolhapur › साखरेचा वापर होणार्‍या पदार्थांवर सेस लावा- शरद पवार

साखरेचा वापर होणार्‍या पदार्थांवर सेस लावा- शरद पवार (Video)

Published On: Apr 23 2018 10:03AM | Last Updated: Apr 23 2018 10:09AM



कोल्हापूर: प्रतिनिधी

उत्पादित होणार्‍या 60 ते 65 टक्के साखरेचा वापर शितपेये, मिठाई सारख्या पदार्थांसाठी होतो, साखरेचे दर कमी झाले तरी या पदार्थांचे दर कधी कमी होत नाहीत. यामुळे साखरेचा वापर होणार्‍या पदार्थांवर सेस लावावा, त्यातून जमा होणारी रक्कम साखर कारखान्यांना द्यावी आणि ती रक्कम ऊस उत्पादकांसाठीच वापरावी अशी सूचना केंद्र सरकारला केल्याचे माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. ऊस उत्पादकांना ही दोन वर्षे काळजीची आहेत, त्यामुळे केंद्र सरकारने मार्ग काढला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पवार म्हणाले, ऊस उत्पादकांची परिस्थिती गंभीर आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपण पत्र दिले आहे. त्यावर मोदी यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीची आज दिल्लीत बैठक होत आहे. गरजेपेक्षा जास्त साखरेचे उत्पादन झाल्याने हा प्रश्‍न निर्माण झाल्याचे सांगत ते म्हणाले, जास्त उत्पादनामुळे भाव कमी आला.यामुळे साखर निर्यात झाली पाहिजे, पण त्याचा खर्च परवडत नाही. यामुळे निर्यातीचा वाहतूक खर्च राज्य व केंद्र शासनाने करावा,  उत्पादकांचे पैसे देण्यासाठी सर्वच कारखाने साखर विक्री करतात आणि दर कमी होतो. त्यासाठी साखरेचा बफर स्टॉकसाठी सरकारने मदत करावी, अनेक कारखाने इथेनॉल बनवतात ते पेट्रोलियम कंपन्या वापरतात. पेट्रोलचा भाव वाढतो पण इथेनॉलचा भाव वाढवून देत नाहीत, तो भाव वाढवला पाहिजे अशा सूचना साखर उद्योगासाठी नेमेलल्या समितीचे अध्यक्ष गडकरी यांना केल्या आहेत असे सागंत आघाडी सरकारच्या काळात आपण साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी हे निर्णय घेतले होते असेही पवार यांनी सांगितले.

उत्पादित साखरेपैकी केवळ 30 ते 35 टक्के साखर ग्राहकाला खाण्यासाठी आवश्यक असते. उर्वरित साखर शितपेये, मिठाई, औषध आदी कारणांसाठी वापरली जाते, असे सांगत पवार म्हणाले, साखरेचे भाव कमी झाले तरी शितपेये,मिठाई आदीचे भाव कमी होत नाहीत, उलट ते वाढतच असतात. यामुळे या पदार्थांवर शक्य असेल तर सेस लावावा. त्यातून मिळणारी रक्कम उत्पादनानूसार कारखान्यांना द्यावी, ती रक्कम केवळ ऊस उत्पादकांसाठीच वापरली जावी अशी कारखान्यांना अट घालावी अशी सूचना केंद्र शासनाला केल्याचेही पवार यांनी सांगितले. 

राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी 25 टक्के साखर खरेदी करू, निर्यातीला अनुदान देऊ अशा घोषणा केल्या आहेत, त्याबाबत पवार म्हणाले, सहकार मंत्र्यांनी सांगितले आहे तर त्याची वाट बघू.आता नाही तर पुढच्या वर्षी तरी होईल, असे झाले तर चांगलेच होईल. शेतकरी मंत्र्यांची नावे लिहून आत्महत्या करत आहेत, यातून शेतकर्‍यांची उद्विग्नता, संताप किती आहे हे दिसते. यांच्या धोरणांमुळेच हे होत आहे, हे चिंताजनक आहे असेही पवार यांनी सांगितले. सर्वच क्षेत्रात मंदी आहे, उत्पादक अडचणीत आहेत. त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत आहे. निर्यात कमी झाली आहे, विकासासाठी गुंतवणूक कमी होत आहे, असे पवार यांनी सांगितले.