Wed, Jul 24, 2019 14:56होमपेज › Kolhapur › खा. महाडिकांच्या घरी पवारांचे चहापान

खा. महाडिकांच्या घरी पवारांचे चहापान

Published On: Feb 12 2018 1:52AM | Last Updated: Feb 12 2018 12:37AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

राष्ट्रवादी काँग्रेसमधील बेदीलीवरून खा. धनंजय महाडिक आणि आ. हसन मुश्रीफ यांच्यातील वादाच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी खा. धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी दिलेली भेट चर्चेचा विषय ठरली. पहिल्या दिवशी खा. पवार यांनी हा कार्यक्रम न घेतल्याने अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला. रविवारी मात्र मामाच्या गावी भेट देऊन आल्यानंतर खा. पवार यांनी खा. महाडिक यांच्या घरी चहापान घेऊन या चर्चेला पूर्णविराम दिला. 

महाडिक  राष्ट्रवादीचे खासदार असले तरी त्यांचा घरोबा भाजपसोबत वाढला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत नाराजी आहे.  लोकसभेच्या रणांगणात कोण कुठल्या पक्षासोबत असणार यावरून सुरू असलेल्या चर्चेत आ. मुश्रीफ यांनी कोणी नसले तरी मीच उमेदवार आहे, असे जाहीर करून प्रा. संजय मंडलिक, खा. महाडिक यांना धक्का दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर खा. शरद पवार यांची खा. धनंजय महाडिक यांच्या घरी भेट होणार का हा चर्चेचा विषय होता. आपल्या सुज्ञ राजकारणाने परिचित असणार्‍या शरद पवार यांनी पहिल्या दिवशी खा. महाडिक यांच्या घरी जाण्याचे नियोजन केले नाही. मात्र, दुसर्‍या दिवशी मामाच्या गावी जाण्यापूर्वी खा. महाडिक यांना घरी जाऊया का अशी विचारणा केल्याचे खा. महाडिक यांनी सांगितले. मामाच्या गावातून आल्यानंतर शरद पवार यांनी खा. महाडिक यांच्या घरी चहापान घेणे पसंद केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आ. हसन मुश्रीफ, आ. श्रीमती संध्याताई कुपेकर, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, के. पी. पाटील, आर. के. पोवार, सौ. अरुंधती महाडिक, आदील फरास आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. खा. महाडिक यांच्या निवासस्थानी भाजप ताराराणी आघाडीचे नगरसेवकांनी हजेरी लावली.  खा. शरद पवार यांना भेटण्यासाठी गेले असता पंचशीलमध्येही हेच चित्र दिसून आले.