Sat, Feb 23, 2019 06:49होमपेज › Kolhapur › फुटबॉल मैदानातील हुल्‍लडबाजी थांबणार कधी?

फुटबॉल मैदानातील हुल्‍लडबाजी थांबणार कधी?

Published On: Feb 06 2018 1:46AM | Last Updated: Feb 06 2018 12:01AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

एकीकडे कोल्हापूरच्या फुटबॉलला असणार्‍या शतकी परंपरेचा टेंबा मिरवायचा आणि दुसरीकडे ही परंपरा बदनाम करण्यासाठी शक्य तितक्या गोष्टी करायच्या, असा प्रकार छत्रपती शाहू स्टेडियमवर पाहायला मिळत आहे. फुटबॉल संघ व खेळाडूंना प्रोत्साहन देण्याच्या नावाखाली समर्थकांकडून सुरू असणार्‍या हुल्लडबाजीने अवघ्या क्रीडानगरीला वेठीस धरण्याचा प्रकार होत आहे. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी दक्ष असणार्‍या पोलिसी खाक्याची पर्वा न करता, किंबहुना बिनधास्तपणे त्यांच्यासमोरच हुल्लडबाजीने परिसीमा गाठली आहे. हुल्लडबाजीसह मैदानातील अर्वाच्च- अश्‍लील शिवीगाळ, घोषणाबाजी, होणारी हाणामारी, दगडफेक आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान या सर्वांमुळे फुटबॉलच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. 

सोशल मीडियाचा गैरवापर...

फुटबॉल हा रांगडा खेळ असल्याने मैदानावर किरकोळ तणावाचे प्रकार अपेक्षित आहेत. यापूर्वीही अनेकवेळा हाणामारी, दगडफेक व तत्सम प्रकार झाले आहेत. एक-दोनदा पोलिस प्रशासनाने फुटबॉल हंगामावर बंदीची कारवाई केली आहे. तरीही यातून शिकवण न घेता हुल्लडबाजीचे प्रकार बिनधास्त सुरूच आहेत. अलीकडे संघ व खेळाडूंना प्रोत्साहनाऐवजी समर्थकांकडून केवळ हुल्लडबाजीच सुरू असल्याचे वास्तव आहे. सोशल मीडियामुळे अगीत तेल ओतण्याचा प्रकार होत आहे. विविध तालीम-मंडळांच्या नावाने फेसबुक, ट्विटर, व्हॉटस् अ‍ॅपवर ग्रुप-अकौंटस् आहेत. सोशल मीडियाचा वापर खेळाचे नियम, चांगल्या खेळाचे कौतुक, आपल्या संघाची परंपरा आणि सध्या सुरू असणारी यशस्वी कारकीर्द सांगण्यासाठी वापरण्यास हरकत नाही. मात्र, सोशल मीडियाचा वापर हुल्लडबाजांकडून नाहक इर्ष्या निर्माण करणे, प्रतिस्पर्धी संघ व खेळाडूंना हिणवणे, एकमेकांविरोधातील पोस्टस् टाकणे या व अशा गोष्टींसाठी केला जातो. यामुळे अविचारी युवाशक्‍ती अशा इर्ष्येला बळी पडून दंगा-धोपा करून हुल्लडबाजी करत आहेत. यामुळे पोलिसांच्या सायबर सेलकडून अशा सोशल मीडिया व ग्रुप्सवर तातडीने अंकुश आणावा, अशी मागणी फुटबॉलप्रेमींतून होत आहे.