Sat, Mar 23, 2019 00:20होमपेज › Kolhapur › राजर्षी शाहू यांच्या नावे जाहीर योजना पूर्ण करा

राजर्षी शाहू यांच्या नावे जाहीर योजना पूर्ण करा

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 26 2018 12:45AMकोल्हापूर : प्रतिनिधी

छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने कोल्हापुरात राज्य शासनाने सुरू केलेल्या जाहीर योजना पूर्ण कराव्यात या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने दसरा चौक येथे  मूक आंदोलन करण्यात आले. 
 यावेळी निवेदनात 2012 साली शाहू मिलच्या जागेवर भव्य अंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली; पण अजूनही शाहू महाराज यांचे भव्य स्मारक येथे उभारू शकले नाही. शाहू जन्मस्थळाचे कामही अपूर्ण स्थितीत आहे. राधानगरी येथे बंद पडलेले विद्युत केंद्र, रेल्वे बोगी तसेच शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचा सुरू असणारा भोंगळ कारभार याला शासन यंत्रणा जबाबदार आहे. शाहू महाराजांनी शैक्षणिक संस्थांना केवळ शैक्षणिक उपयोगासाठी दिलेल्या मोफत जागांचा वापर काही संस्था व्यवसायासाठी करून त्यामधून नफा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.  

शाहू महाराजांच्या स्मारकासाठी उपलब्ध असणारी जागा महापालिकेला विनामोबदला हस्तांतरित करण्यात यावी, जागेच्या हस्तांतरणाबाबत जिल्हाधिकारी यांनी पत्रव्यवहार करण्यात आले. पण अजूनही त्याच्या हस्तांतरणाचा प्रश्‍न सुटलेला नाही. छत्रपती शाहू महाराज यांनी देशाला समतेचा संदेश दिला. त्यांचे नाव घेऊन काम करणार्‍या शासनाने तत्काळ प्रलंबित कामे पूर्ण करावीत, अशी मागणी करण्यात आली.

 या आंदोलनात संजय पवार, विजय देवणे,  दुर्गेश लिंग्रस, शिवाजी जाधव, कमलाकर जगदाळे, सुजित चव्हाण, राजेंद्र पाटील, शशि बिडकर,  चंदू भोसले, संजय जाधव, अरविंद यादव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.