Tue, Jun 18, 2019 19:25होमपेज › Kolhapur › राजर्षींच्या जयजयकाराने करवीरनगरी दुमदुमली

राजर्षींच्या जयजयकाराने करवीरनगरी दुमदुमली

Published On: Jun 27 2018 1:20AM | Last Updated: Jun 27 2018 1:01AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

‘हीरे-माणके-सोने उधळा, जयजयकार करा, जय राजर्षी शाहू राजा तुजला हा मुजरा...’ असे प्रेरणादायी गीत, दूरद‍ृष्टीने राजर्षी शाहूंनी विविध क्षेत्रांत केलेल्या कार्याची माहिती देणारे डिजिटल फलक, पारंपरिक वाद्यांच्या गजरात लवाजम्यासह मंगळवारी भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामुळे करवीरनगरी दुमदुमली. तत्पूर्वी, ऐतिहासिक दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. भरपावसात आबालवृद्ध, नागरिक रयतेच्या राजाला त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
कसबा बावडा येथील राजर्षी शाहू जन्मस्थळ लक्ष्मी-विलास पॅलेस येथे जयंतीचा मुख्य सोहळा झाल्यानंतर मान्यवरांनी दसरा चौकातील राजर्षी शाहूंच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील व उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांच्या हस्ते आणि शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, महापौर सौ. शोभा बोंद्रे, आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी, उपमहापौर महेश सावंत, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डी. बी. पाटील, केएसएचे सचिव माणिक मंडलिक, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, मुस्लिम बोर्डिंगचे सर्व संचालक व विविध क्षेत्रांतील मान्यवर, शासनाच्या विविध विभागांचे 
प्रमुख पदाधिकारी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस दलाच्या बँडनेे सोहळ्याची शोभा वाढविली.  
भव्य मिरवणूक
यानंतर प्रतिवर्षीप्रमाणे दसरा चौक-बिंदू चौक-छत्रपती शिवाजी चौक-भाऊसिंगजी रोड-मनपा चौक-सीपीआर चौक या मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली. राजर्षी शाहूंच्या कार्याचा गौरव करणार्‍या देखाव्यांचे चित्ररथ, सजीव देखावे, पारंपरिक वाद्ये आणि लोकराजाचा अखंड जयघोष करणारे शेकडो विद्यार्थी असे या मिरवणुकीचे स्वरूप होते. मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. मिरवणुकीत करवीर प्रशाला, जवाहरनगर हायस्कूल, छत्रपती शहाजी कॉलेज, श्रीपतराव बोंद्रे इंग्लिश स्कूल, राजर्षी शाहू आश्रमशाळा पाचगाव, दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटी, नेहरू हायस्कूल, साई हायस्कूल, विवेकानंद कॉलेज, छत्रपती शाहू विद्यालय, ताराराणी विद्यापीठ व उषाराजे हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, वेणुताई चव्हाण कॉलेज, सामाजिक न्याय विभाग या संस्था-संघटनांनी मिरवणुकीत सहभाग घेतला.