Mon, Oct 21, 2019 03:30होमपेज › Kolhapur › लोकराजाला अभिवादनासाठी अवघे सज्ज

लोकराजाला अभिवादनासाठी अवघे सज्ज

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 26 2018 12:55AMकोल्हापूर/कसबा बावडा : प्रतिनिधी 

‘बहुजन हिताय-बहुजन सुखाय’, या ध्येयाने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी आपली संपूर्ण हयात खर्ची घातली. दूरदृष्टीने विविध क्षेत्रांत लोकोपयोगी योजना राबवून कोल्हापूरचा सर्वांगीण विकास केला. यामुळेच जगाच्या नकाशावर ‘शाहूनगरी’ कोल्हापूरने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.  अशा कोल्हापूरचे भाग्यविधाते असणार्‍या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जयंती सोहळा मंगळवारी (दि. 26)  भव्यतेने साजरा केला जाणार आहे.  यासाठी अवघे सज्ज झाले आहेत. 

दरम्यान,  शाहू जन्मस्थळ (लक्ष्मी विलास पॅलेस), दसरा चौकातील पूर्णाकृती स्मारक, राजर्षी शाहू सभागृह, न्यू पॅलेस, शिवाजी विद्यापीठ यासह ठिकठिकाणी असणार्‍या राजर्षी शाहू पुतळ्यांचे सुशोभीकरण, ध्वज, पताकांसह विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. याशिवाय, शाहूप्रेमी संस्था-संघटनांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भव्य मिरवणुका, समाजप्रबोधनपर व्याख्याने, आदर्श कार्य करणार्‍या लोकांचा सन्मान यासह विविध कार्यक्रमांनी परिपूर्ण असा शाहू जयंतीचा सोहळा होणार आहे. 

दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन

शंभर वर्षांपूर्वी राजर्षी शाहूंनी  बहुजन समाजाच्या उद्धारासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. त्यांनी  राबविलेल्या लोककल्याणकारी  योजनांची माहिती भावी पिढीला व्हावी, या उद्देशाने अ. भा. मराठा महासंघ व सह्याद्री इतिहास संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने अनोखे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनात शाहूकालीन दुर्मीळ छायाचित्रे, अस्सल दस्तऐवज यांची माहिती मांडण्यात आली आहे. ‘रयतेच्या हिताचे शाहू कार्य : राजर्षी शाहूंचे विचार दर्शन’ या विषयावर दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक सभागृहात हे प्रदर्शन 24 ते 27 जून या कालावधीत दररोज सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत सुरू राहणार आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांच्या अभ्यासातून निर्माण झालेल्या  प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक यांनी पत्रकाद्वारे केले आहे. 

जयंती उत्सव समितीची मिरवणूक

 लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्सव समितीतर्फे मिरजकर तिकटी, मंगळवार पेठ येथून  दुपारी 4.30 वाजता मिरवणूक निघणार आहे. उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व शाहू महाराज यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. यावेळी दै ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव, महापौर शोभा बोंद्रे, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती,  उपस्थित राहणार आहेत. मिरवणुकीत नागरिकांनी कर्तव्य भावनेतून सहभागी होण्याचे आवाहन समितीचे कार्याध्यक्ष तथा देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केले आहे. 

85 तालीम संस्थांसह मिरवणूक

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज प्रतिष्ठानतर्फे सायंकाळी 4 वाजता, खासबाग कुस्ती मैदानापासून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून यात तब्बल 85 तालीम संस्था व तरुण मंडळांचा सहभाग असणार आहे. प्रत्येक तालीम मंडळातील 11 पदाधिकारी-कार्यकर्ते मानाचा कोल्हापूर फेटा बांधून मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन न करता,  पारंपरिक लवाजम्यासह शाहू खासबाग मैदान-मिरजकर तिकटी-खरी कॉर्नर-महाद्वार रोड-पापाची तिकटी-शिवाजी चौक या मार्गावरून निघणार्‍या मिरवणुकीत कोल्हापुरातील प्रत्येक नागरिकाने कर्तव्य भावनेतून सहभागी होण्याचे आवाहन पै. बाबा महाडिक यांनी केले आहे. 

शेका पक्षातर्फे व्याख्यान

भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे प्राचार्य डॉ. विलास पोवार हे ‘राजर्षी शाहूंचे लोकोपयोगी कार्य’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. अध्यक्षस्थानी  शहर चिटणीस  बापुराव कदम असणार आहेत. मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता, टेंबे रोडवरील पक्षाच्या कार्यालयात व्याख्यान होईल. यावेळी उपस्थित राहाण्याचे आवाहन सुशांत बोरगे यांनी केले आहे. 

सत्यशोधक समाजातर्फे व्याख्यान

शाहू सत्यशोधक समाजातर्फे गंगावेश येथील समाज कार्यालयात मंगळवारी सायंकाळी 5 वाजता प्राचार्य डॉ. इस्माईल पठाण यांचे ‘राजर्षी शाहू व सत्यशोधक समाज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. अध्यक्षस्थानी माजी आ. संपतराव पवार-पाटील असणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन समाजाचे अध्यक्ष बाबुराव कदम यांनी केले आहे. WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DEeePAgbWU94pj0zgYWo19