Thu, May 23, 2019 04:51होमपेज › Kolhapur › लोकराजा शाहू महाराजांना अभिवादन

लोकराजा शाहू महाराजांना अभिवादन

Published On: Jun 27 2018 1:20AM | Last Updated: Jun 26 2018 11:40PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

राजर्षी शाहू महाराजांचा अखंड जयघोष... कडाडणारी हलगी... मर्दानी युद्धकलेची चित्तथरारक प्रात्यक्षिके... धनगरी ढोल, ताशांचा कडकडाट, अशा उत्साही वातावरणात मंगळवारी राजर्षी शाहू महाराजांच्या भव्य मिरवणुका काढण्यात आल्या. लोकराजा राजर्षी शाहू महाराज संयुक्त जयंती उत्सव समिती आणि लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठानतर्फे याचे आयोजन करण्यात आले होते.

श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महडिक, महापौर शोभा बोंद्रे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश सुभेदार यांच्या हस्ते मिरजकर तिकटी येथे शाहू महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी उपमहापौर महेश सावंत, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष व उत्सव समितीचे कार्याध्यक्ष महेश जाधव, राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य आर. के. पोवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे उपस्थित होते. 

मिरजकर तिकटी येथून मिरवणुकीला सुरुवात झाली. प्रबोधानात्मक फलकांसह रिक्षा सहभागी झाल्या होत्या. कै. आनंदराव पोवार मर्दानी कला पथक, महे येथील भैरवनाथ धनगरी ढोल पथक, राजर्षी शाहू महाराजांच्या वेशभूषेतील मुले, मोतीबाग तालीम मंडळाचे मल्ल, बारा बलुतेदार मिरवणुकीत सहभागी झाले होते.

प्रबोधनात्मक फलक

औद्योगिक संस्थेची स्थापना, माणगाव परिषद, शाहू मिल बंद, सक्तीचे शिक्षण पण आज शाळा बंद, समाधीस्थळ, जन्मस्थळाचे काम रखडलेले अशा प्रश्‍नांकडे प्रबोधनात्मक फलकांतून लक्ष वेधण्यात आले. मिरवणुकीत युवा नेते ऋतुराज पाटील, ऋतुराज क्षीरसागर, अ‍ॅड. धनंजय पठाडे, नगरसेवक संतोष गायकवाड, अशोक जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, सुभाष देसाई, जयकुमार शिंदे, बाबा पार्टे, गणी आजरेकर, कादर मलबारी, अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, अ‍ॅड. संपतराव पवार, पंडितराव पोवार, तानाजी पाटील, लालासाहेब गायकवाड, किशोर घाटगे, प्रकाश गवंडी, सुरेश जरग, सतीशचंद्र कांबळे, शाम जोशी, के. रामाराव, नंदकुमार मराठे सहभागी झाले. 

शिवकालीन युद्धकलेचा थरार

पारंपरिक वाद्यांचा गजर आणि शिवकालीन युद्धकलेचा थरार अशा उत्साही वातावरणात  लोकराजा छत्रपती राजर्षी शाहू प्रतिष्ठानतर्फे मिरवणूक काढण्यात आली.केशवराव भोसले नाट्यगृह येथे शाहू महाराज आणि महापौर सौ. शोभा बोंद्रे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी ऋतुराज पाटील, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष पै. बाबासाहेब महाडिक, उपाध्यक्ष हिंदुराव हुजरे-पाटील, जगदीश जगताप, मदन पाटील, डॉ. संदीप पाटील, उज्ज्वल नागेशकर, मदन पाटील, नगरसेवक शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक आदिल फरास, दिगंबर फराकटे, परीक्षीत पन्हाळकर, राजू सावंत, बाबा इंदुलकर, शिवराज महाडिक, युवराज महाडिक, इंद्रजित बोंद्रे यांच्यासह शाहूप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासबाग कुस्ती मैदान येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. सजविलेल्या बग्गीत शाहू महाराजांची आकर्षक मूर्ती ठेवण्यात आली होती. महिला व युवती मिरवणुकीत भगवे फेटे आणि भगव्या साड्या परिधान करून सहभागी झाल्या होत्या. शाहू महाराजांची वेशभूषा परिधान करून सहभागी बालचमू आकर्षण ठरला. शाहू खासबाग येथून पुढे मिरजकर तिकटी,  महाद्वार रोड, पापाची तिकटीमार्गे शिवाजी चौकात मिरवणुकीची सांगता झाली. 

लक्षवेधी फलक

शिवस्मारक, ताराराणी स्मारक उभारणी करून थोरांचा गौरव, विविध जाती-धर्मातील लोकांच्या विकासासाठी शिक्षणाची सक्ती, त्यासाठी उभारलेली विद्यार्थी वसतिगृहे, बाबासाहेब आंबेडकर यांना शैक्षणिक मदत व कारकिर्दीस प्रोत्साहन, खासबाग मैदान आणि दूरदृष्टीने उभारलेले बंधारे या विषयांवरील फलक लक्षवेधी  ठरले. 

85 तालमीच्या कार्यकर्त्यांना फेटे

मिरवणुकीत सहभागी शहर, उपनगर व ग्रामीण भागातील 85 तालीम मंडळांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार प्रतिष्ठानतर्फे कोल्हापुरी फेटे बांधून करण्यात आला. प्रत्येक तालीम मंडळाला 11 फेटे देण्यात आले. याशिवाय मान्यवर पाहुण्यांचाही गौरव मानाचा फेटा देऊन करण्यात आला.