Tue, Apr 23, 2019 01:38होमपेज › Kolhapur › जिल्ह्यातील 24 जणांना शाहू पुरस्कार

जिल्ह्यातील 24 जणांना शाहू पुरस्कार

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 26 2018 12:47AMकोल्हापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू जयंतीनिमित्त दरवर्षी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व कर्मचर्‍यांना देण्यात येणार्‍या राजर्षी शाहू पुरस्कारासाठी आज नावे जाहीर करण्यात आली. यात 6 जिल्हा परिषद सदस्य, 3 पंचायत समिती व 15 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शौमिका महाडिक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी नावांची घोषणा केली.

सौ. महाडिक म्हणाल्या, निवड झालेल्या जिल्हा परिषद सदस्यांमध्ये भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य शक्ती, शिवसेना व शाहू विकास आघाडीच्या सदस्यांचा समावेश आहे. सभागृहातील वर्तणूक, चारित्र्य, मतदारसंघातील विकासकामे, अन्य संस्थांकडून सदस्यांच्या कामाची घेतलेली दखल, जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणार्‍या अभियानातील सहभाग, मतदारसंघात राबविण्यात आलेले नावीन्यपूर्ण उपक्रम आदी निकषांवर सदस्यांची निवड करण्यात आली आहे.

डॉ. खेमनार म्हणाले, राजर्षी शाहू पुरस्कारासाठी कर्मचार्‍यांकडून दोन महिन्यांपूर्वी प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यातून 15 जणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये शिक्षक व ग्रामसेवकांचा समावेश नाही. गोपनीय अहवालातील शेरे, प्रशासकीय कामाची माहिती, नियमांचे ज्ञान, समय सुचकता, सामाजिक, शैक्षणिक, कला गुण, सचोटी व प्रामाणिकपणा, तांत्रिक पदासाठी लागणारे विशेष ज्ञान आदी बाबी विचारात घेऊन पुरस्कारासाठी कर्मचार्‍यांची नावे निश्‍चित केली जातात.

यावेळी सर्जेराव पाटील, अंबरिश घाटगे, शुभांगी शिंदे, विशांत महापुरे, सर्जेराव पाटील-पेरिडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ उपस्थित होते.