होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : पैसे न देणार्‍यांचाच ‘बंदोबस्त’

कोल्हापूर : पैसे न देणार्‍यांचाच ‘बंदोबस्त’

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 21 2018 1:08AMकोल्हापूर : गौरव डोंगरे

रजा, प्रशिक्षण, साप्‍ताहीक सुट्टी अशा कारणांसाठी ‘रेटकार्ड‘ प्रमाणे पैसे वसुलीचा मनमानी कारभार... ‘खुशाली‘ मिळाली तर बंदोबस्तातून सवलत... पुण्यातून वसुलीसाठी खासगी इसमांचे ‘राखीव‘ पथक यासह कोणतेही काम असो त्यातून केवळ अर्थार्जनाचा हेतू. पैसे मिळाले नाही तर त्याचा ‘बंदोबस्त‘ करण्याचा हेका भारत राखीव बटालियनमध्ये सुरू होता. मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 40 हजारांच्या लाचप्रकरणी उपअधीक्षकासह सहा जणांना अटक केली. 

भ्रष्टाचाराच्या वारंवार तक्रारी असणार्‍या कार्यालयात आतापर्यंतची मोठी कारवाई समजली जात आहे. कर्मचार्‍यांना कोणत्याही कामासाठी येथे पैसे मोजावे लागत होते. काही दिवसांपूर्वी अतिरिक्‍त महासंचालक संदीप कर्णिक यांना मिळालेल्या निनावी अर्जांवरून काहींची चौकशी सुरू होती. पण असे असूनही पैसे घेण्याचा प्रकार सुरूच होता. 

न परवडणारे रेटकार्ड

भारत राखीव बटालियन तीनची स्थापना दहा वर्षांपूर्वी झाली. कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील 750 जवान सेवेत आहेत. चालक प्रशिक्षण 10 हजार रुपये, खानावळीसाठी 2500 रुपये, हजेरीत सवलत 100 ते 500 रुपये, रजा 100 ते 500 रुपये या रेटकार्डप्रमाणे जवानांकडून पैसे वसूल होत असल्याचे बोलले जात आहे. 

खासगी इसमांची नियुक्‍ती

पुण्यातील एका साहेबाने पैशाच्या वसुलीसाठी खासगी इसमांचे पथकच बनवले होते. साहेब येताना या ‘बाउंन्सर‘चा जथ्था त्याच्या सोबत असायचा. त्याची फेरी म्हणजे भरभक्‍कम ‘खुशाली‘ असा अलिखीत नियम होता. महिन्यातून त्याचे फेरी याच कामासाठी असायची. तो नाही आला तर त्याचे पंटर हप्‍ता वसुलीसाठी येत असत. 

मोठे मासे सापडणार का?

खेळाडूंच्या भत्त्यात मन दाखवून त्यांच्याकडून पैसे वसूल करणार्‍या सहा जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. मात्र, यांच्यापेक्षाही मोठे मासे अद्याप गळाला लागलेले नाहीत, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. 

सखोल चौकशी होणार का?

भारत राखीव बटालियनसाठी कोल्हापूरसह आसपासच्या परीसरात जागेचा शोध सुरु आहे. मात्र, याच्याशी सोयरसुतक नसणार्‍या वरीष्ठांकडून बिनदिक्‍कत आपली पोतडी भरण्याचेच काम सुरु होते. मागील अनेक वर्षांपासून ही वसुली सुरु होती. यामुळे यापुर्वीच्या ‘भ्रष्टाचार्‍यांची‘ चौकशी होणार का असा सवाल जवानांमधून उपस्थित होत आहे.