Sun, Mar 24, 2019 04:40होमपेज › Kolhapur › शिवसेनेसह भाजपसमोरही प्रबळ उमेदवाराचा शोध

शिवसेनेसह भाजपसमोरही प्रबळ उमेदवाराचा शोध

Published On: Jun 20 2018 1:33AM | Last Updated: Jun 19 2018 11:57PMकोल्हापूर ः निवास चौगले

यापुढच्या सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेल्या शिवसेनेसह सत्तेची ताकद असलेल्या भारतीय जनता पक्षासमोरही हातकणंगले लोकसभा मतदार संघात प्रबळ उमेदवारांचा शोध घ्यावा लागणार आहे. सद्यस्थितीत सेनेची भिस्त ही उसन्या उमेदवारांवरच आहे, अलीकडेच कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनीच पक्षाने सांगितले तर लोकसभा लढण्याची इच्छा व्यक्‍त केल्याने ते भाजपचे संभाव्य उमेदवार असतील. 

यापूर्वीच्या या मतदार संघाच्या निवडणुकीत पुंडलिक जाधव यांचा अपवाद सोडला तर शिवसेनेने ऐनवेळी पक्षात आलेल्यांनाच उमेदवारी दिली. त्यात माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, मयूरचे डॉ. संजय पाटील, शेतकरी संघटनेचे रघुनाथदादा पाटील यांचा समावेश होता. भाजपकडून तर  सुभाष वोरा व गणपतराव सरनोबत यांची उमेदवारी सोडली तर पक्षाला तीन निवडणुकीत उमेदवारच मिळाला नव्हता. या मतदार संघात सेनेचे तीन आमदार असूनही लोकसभेला कोण, असा प्रश्‍न समोर येईल त्यावेळी आमदार उल्हास पाटील यांच्याशिवाय दुसरे नाव पुढे येत नाही. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वावर नाराज असलेले श्रीमती माने यांचे सुपुत्र धैर्यशील माने हे सेनेच्या उमेदवारीचे दावेदार ठरू शकतात, पण श्रीमती माने यांना दोनवेळा दिलेली खासदारकी, अखिल भारतीय राष्ट्रवादी महिला काँगे्रसचे अध्यक्षपद व त्यांची पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी असलेले ऋणानुंबध पाहता लगेच हा निर्णय त्यांच्याकडून होण्याची शक्यता सध्यातरी नाही. 

2014  च्या निवडणुकीत खासदार राजू शेट्टी भाजपच्या हाताला लागले. तीन वर्षे भाजपसोबत राहिल्यानंतर त्यांनीही त्यांची साथ तर सोडलीच, पण आता भाजपविरोधातच त्यांनी रान उठवले आहे. भाजपच्यादृष्टीने शेट्टींना रोखणे महत्त्वाचे आहे. केंद्रात मंत्रिपदाच्या अटीवर शेट्टी भाजपसोबत गेले, प्रत्यक्षात भाजपने शेट्टी यांचे बिन्नीचे शिलेदार असलेल्या सदाभाऊ खोत यांनाच मंत्री करून या दोघांत वादाची ठिणगी टाकली. एका संघटनेतील दोन नेत्यांत वाद झाल्याशिवाय फायदा होत नाही हे ओळखूनच भाजपने ही खेळी केली. या दोघांतील संघर्ष वाढवून संघटनेची ताकद कमी करण्यात आतापर्यंत तरी भाजपला यश आले आहे, पण लोकसभा जिंकायची झाल्यास प्रबळ उमेदवारांचा प्रश्‍न आहेच.

या मतदार संघात भाजापाचे दोन आमदार आहेत. यापैकी शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक हे मंत्रिमंडळात डावलल्याने नाराज आहेत. माजी मंत्री विनय कोरे यांचेही नाव भाजपच्या यादीत आहे, पण त्यांना लोकसभेपेक्षा विधानसभेत जास्त इंटरेस्ट आहे. काही सनदी अधिकार्‍यांची नावेही भाजपच्या यादीत होती, पण संबंधित अधिकार्‍यांनीच याला नकार दिला आहे. भाजपसोबत काडीमोड घेतल्यानंतर त्यांचे वाभाडे काढणारे खासदार शेट्टी यांची अलीकडे काँगे्रससोबतची बैठक वाढली आहे.  

 शेट्टीच आघाडीचे उमेदवार ?

लोकसभेसाठी दोन्ही काँगे्रसची आघाडी निश्‍चित आहे. त्यात हा मतदारसंघ काँगे्रसच्या वाट्याला आहे, अलीकडेच एका कार्यक्रमात शेट्टी आणि आम्ही एकत्र आहोत, अशी जाहीर घोषणा काँगे्रसचे माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली आहे. त्यामुळे शेट्टी हेच आघाडीच्या उमेदवारीवर स्वार होण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सेना व भाजपलाही या मतदार संघात तगड्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.