Fri, Aug 23, 2019 14:25होमपेज › Kolhapur › शाळेच्या पडक्या खोलीत साकारले वाचनालय

शाळेच्या पडक्या खोलीत साकारले वाचनालय

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 12 2018 11:37PM

बुकमार्क करा
वडणगे : वार्ताहर

सादळे - मादळे डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या जठारवाडी (ता. करवीर) येथील तरुणांनी गावातील मुलांना वाचनाची आवड लागावी आणि स्पर्धा परीक्षेतून गावात अधिकारी तयार व्हावेत यासाठी गावातील प्राथमिक शाळेच्या वापरात नसलेल्या दोन पडक्या खोल्यांमध्ये वाचनालय आणि अभ्यासिका सुरू करण्याचा ध्यास घेतला आहे.

जठारवाडी गावची लोकसंख्या अवघी दोन हजारच्या आसपास शेती हाच येथील मुख्य व्यवसाय. गावापासून शिरोली एमआयडीसी अगदी जवळच. त्यामुळे दहावी - बारावी नंतर एमआयडीसीत हमखास नोकरीची हमी. त्यामुळे दहावीनंतर शिकणार्‍यांची संख्या येथे अगदीच नगण्य. केवळ बोटावर मोजता येतील एवढेच गावात पदवीधर. शासकीय नोकरी तर खूप लांबची गोष्ट. मात्र, या सगळ्याला छेद दिला गावातील महादेव जठार या तरुणाने. अत्यंत खडतर परिस्थितीतून शिकून महादेव गावातून पहिला पोलिस उपनिरीक्षक झाला. येथील प्राथमिक शाळेच्या एका सत्कार कार्यक्रमात महादेवने गावात एक वाचनालय आणि मुलांसाठी अभ्यासिका असावी, अशी इच्छा आपल्या मनोगतात व्यक्‍त केली. या कार्यक्रमाला जठार यांना ज्युनिअर असणारे शाळेचे काही माजी विद्यार्थी उपस्थित होते. जठार यांनी व्यक्‍त केलेल्या इच्छेतूनच या तरुणांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे फुटले आणि इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेले संग्राम जाधव, प्रदीप खाडे, राहुल शिलोकर, ओमकार जठार, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारा पृथ्वीराज खोत, नोकरी करणारा शुभम गुरव या सहा तरुणांनी गावात वाचनालय आणि अभ्यासिका सुरू करण्याचा निर्धार केला.

गावात वाचनालय सुरू करायचे तर मुख्य अडचण होती ती जागेची. सुरुवातीस या तरुणांनी जागेचा शोघ घेतला. मात्र, हवी तशी जागाच त्यांना मिळत नव्हती. शेवटी गावातील प्राथमिक शाळेच्या छत नसलेल्या आणि पूर्ण पडझड झालेल्या दोन खोल्यांकडे त्यांचे लक्ष गेले. शाळेच्या याच वापरात नसलेल्या खोल्यांमध्ये गावासाठी वाचनालय व अभ्यासिका सुरू करण्याचा या तरुणांनी चंग बांधला. याबाबत यांनी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांची चर्चा केली. शाळेकडूनही त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. वाचनालयासाठी शाळेची जागा वापरायची तर प्राथमिक शिक्षण विभागची परवानगी घेणे आवश्यक होते. याबाबत शाळेने पुढाकार घेऊन शिक्षणाधिकार्‍यांची परवानगी मागितली. शिक्षणाधिकार्‍यांनीही परवानगी दिली. जागेसाठी परवानगी मिळताच हे सहा तरुण कामाला लागले. रात्रंदिवस मेहनत घेऊन या तरुणांनी या जुन्या वर्गखोल्यांची साफसफाई केली.

या सहा तरुणांचे काम बघून गावातील इतरही तरुण मदतीसाठी आले. छत नसलेल्या या खोल्यांचे पावसाळ्यापूर्वी रूपकाम करणे गरजेचे होते. यासाठी पैशाची गरज होती. गावातील तरुण वाचनालय सुरू करतायेत ही माहिती पोलिस उपनिरीक्षक महादेव जठार यांना समजताच त्यांनी मदत म्हणून संग्राम जाधव या तरुणाच्या खात्यावर दहा हजारांची रक्‍कम जमा केली. आकुर्डी (पुणे) येथे प्राध्यापक असणारे जयदीप खाडे, एअरफोर्समध्ये कार्यरत असणारे प्रकाश जाधव यांनीही यावेळी मदतीचा हात दिला. या मदतीतून दोन्ही खोल्यांचे लोखंडी रूपकाम केले. गावात घराघरांत शिल्‍लक असणार्‍या दोन-दोन खापर्‍या जमा करून या तरुणांनी छतावर खापर्‍याही बसवल्या.

वाचनालयावर छत तर बसले आता खोल्यांची इतर डागडुजी करण्यासाठी आणखी निधीची गरज होती. मदतीसाठी हे तरुण गावात घरोघरी फिरले. गावच्या भल्यासाठी ही मुलं काहीतरी करत आहेत. हे पासून लोकांनीही त्यांना सढळहस्ते मदत केली. 

लोकांनी केलेल्या मदतीतून एक लाखाची रक्‍कम जमा झाली. यातून भिंतींची डागडुजी, रंगकाम, लाईट फिटिंग, दारे, खिडक्या इ. कामे करण्यात आली. यावेळी गुंंडा स्वामी यांनी फॅब्रिकेशनचे संपूर्ण काम विनामोबदला करून दिले. निखिल जठार, मयुरेश मानुगडे यांनी लाईट फिटिंगचे काम केले. नाथाजी पाटील यांनी सामानाची ने-आण करण्यासाठी वाहनाची व्यवस्था केली. तरुणांनी रात्रंदिवस खपून केलेल्या या कामामुळे पडझड आणि पूर्ण जीर्ण झालेल्या दोन खोल्यांचे रूप पालटलं आणि एक सुंदर वाचनालय आकाराला आलं आहे.