Tue, Apr 23, 2019 23:58होमपेज › Kolhapur › कंटेनर-स्कूल बस अपघातात  तीन ठार; 26 विद्यार्थी जखमी

कंटेनर-स्कूल बस अपघातात  तीन ठार; 26 विद्यार्थी जखमी

Published On: Jun 27 2018 1:20AM | Last Updated: Jun 27 2018 1:06AMहातकणंगले : प्रतिनिधी 

भरधाव कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनरमधील दोघे व घोडावत इंटरनॅशनल स्कूल बसचा चालक असे तिघे ठार, तर 26 विद्यार्थी जखमी झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी साडेआठ वाजता माले फाट्याजवळ झाला.

मृतांमध्ये कंटेनरमधील सुरेश गणपती खोत (वय 34, रा. लोणारवाडी, ता. कवठेमहांकाळ), सचिन खिलारी (30, रा. शोणेवाडी, ता. आटपाडी) व स्कूल बसचा चालक जयसिंग गणपती चौगुले 
(32, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) यांचा समावेश आहे. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघातातील जखमी विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे : विजय पोवार, ओंकार पोवार, आदित्य भटेजा, मानस भटेजा, पार्थ पाटील, लावण्य घोष, एकता चौपलानी, विशाल गोपिया, भूमिका शर्मा, सुधी वाधवा, सोहम वाधवा, अधिराज्य मसुटे, आराध्या पाटील, आयुष मसुटे, आर्यन जेवराणी, साहिल गोपलानी, जिया जेवराणी, जतिन रजनी, ऋतुजा बडे, हितेश मसुटे, खुशाली शर्मा, धीरज शर्मा, भूमिका शर्मा, मोहन वाधवा, प्रियेशा दरडा, अदित्य राजानी यांच्यावर कोल्हापूर येथील अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
ही स्कूल बस (एम.एच. 09 बीसी 3049) गांधीनगरमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींना घेऊन सकाळी घोडावत संकुलाकडे येत होती. यावेळी बसमध्ये सव्वीस विद्यार्थी व दोन सेवक होते. सकाळी साडेआठ वाजता बस माले फाट्याच्या पुढे आली. त्याचवेळी सांगलीहून कोल्हापूरकडे निघालेल्या कंटेनर (एम.एच. 09 ईएम 3939) वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेला गेला. बसचालक जयसिंग गणपती चौगुले यांना हा गंभीर प्रकार लक्षात येताच त्यांनी बस शेतात वळवण्याचा प्रयत्न केला. परंतु, समोरून आलेल्या कंटेनरने बसच्या समोरील बाजूस जोराची धडक दिली. यामध्ये बस व कंटेनरच्या समोरील भागाचा चक्‍काचूर झाला. बसमध्ये विद्यार्थ्यांच्या चपला व शैक्षणिक साहित्य अस्ताव्यस्त पडले होते.

अपघात होताच विद्यार्थी- विद्यार्थिनींनी आरडाओरडा सुरू केला. रूकडीचे सरपंच रफीक कलावंत, उपसरपंच शीतल खोत, नंदू शिंगे, शमुवेल लोखंडे, राजू कोळी यांनी जखमी विद्यार्थ्यांना रूकडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. रूकडी  येथील डॉक्टरांनी जखमींवर प्राथमिक उपचार करून सर्वांना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. अपघातानंतर सांगली-कोल्हापूर रस्त्यावर दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यानंतर हातकणंगलेचे पोलिस निरीक्षक सी. एल. डुबल व पोलिस कर्मचार्‍यांनी तत्काळ वाहनांना वाट मोकळी करून दिली.

गांधीनगर : गांधीनगरची मुले घेऊन जाणार्‍या बसला अपघात झाल्याचे भारतीय सिंधू सभेच्या मनोज बचवानी यांना समजले. ते आपले सहकारी रवी मलानी, रिकी चुघानी, विनोद रोहिडा, यश गिडवानी, अमित केसवानी व हिरा परमानंदानी यांच्यासमवेत घटनास्थळी पोहोचले. या बसमध्ये पंधरा-वीस मुले गांधीनगरची होती. त्यांची विचारपूस त्यांनी केली. या अपघातामुळे संपूर्ण गांधीनगर चिंताग्रस्त बनले.