Wed, Jul 17, 2019 12:36होमपेज › Kolhapur › राज्यातील शाळा १० ऑगस्टनंतर बेमुदत बंद

राज्यातील शाळा १० ऑगस्टनंतर बेमुदत बंद

Published On: Jul 21 2018 1:35AM | Last Updated: Jul 21 2018 1:35AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिक्षक भरतीसाठी शासनाने निर्माण केलेली ‘पवित्र’ पोर्टलप्रणाली संस्थाचालकांच्या स्वायत्ततेवर गदा आणणारी असून, यामुळे संस्थाचालकांचे शिक्षक भरतीचे अधिकार पूर्णपणे काढून घेतले जाणार आहेत. याला विरोध व प्रलंबित प्रश्‍नांसाठी राज्यातील शाळा 10 ऑगस्टनंतर बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ व कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठच्या संयुक्‍त मेळाव्यात शुक्रवारी घेण्यात आला.

श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग येथे शुक्रवारी (दि. 20) पाच जिल्ह्यांतील संस्थाचालकांचा संयुक्‍त मेळावा झाला. अध्यक्षस्थानी राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात होते. यावेळी प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊसचे अध्यक्ष डी. बी. पाटील म्हणाले, कोणतीही गोष्ट लढाईशिवाय मिळालेली नाही. ‘पवित्र’ पोर्टलप्रणाली बंद करण्यासाठी शासनावर दबाव आणला पाहिजे. अगोदर नोटीस देऊ, त्यानंतर शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात यावा. प्रा. जयंत आसगावकर म्हणाले, शिक्षणमंत्र्यांना संस्थाचालक दरोडेखोर, लुटारू वाटत आहेत. दहावी, बारावी परीक्षेचा निकाल पाहता जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांनी गुणवत्ता देण्याचे काम केले आहे. बहुजनांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवून चांगली यंत्रणा मोडीत काढण्याचा सरकारचा डाव आहे. यासाठी ‘पवित्र’ पोर्टलला विरोध करण्याची गरज आहे.

जयकुमार कोले म्हणाले, संस्थाचालकांकडून चालविल्या जाणार्‍या शाळांची गुणवत्ता सरकारने बघावी. यात कोठेही भ्रष्टाचार आढळल्यास संस्थेची मान्यता काढून घेण्यात यावी. संस्थाचालक प्रामाणिकपणे काम करीत असताना 2012 पासून शिक्षक भरती नाही. तुकड्यांना परवानगी नाही, अनुदानही बंद आहे. न्यायालयात याचिका दाखल करून शिक्षण संस्था बंद करून शिक्षणाधिकार्‍यांच्या दालनात ठाण मांडून बसले पाहिजे.

माजी आ. राजीव आवळे म्हणाले, साखर कारखान्यांच्या आंदोलनावेळी सरकार व विरोधक एकत्र येतात. परंतु, संस्थाचालकांच्या प्रश्‍नावर कोणीच बोलत नाही. जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे म्हणाले, जिल्हा परिषदेचा शिक्षण समिती सभापती असलो, तरी छोटासा संस्थाचालक आहे. जिल्हा परिषदेच्या दि. 10 ऑगस्ट रोजी होणार्‍या सर्वसाधारण सभेत ‘पवित्र’ पोर्टलप्रणालीविरोधात ठराव मांडून मंजूर करून घेणार असल्याचे तेे म्हणाले.

स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ. युवराज भोसले म्हणाले, शिक्षण संस्थाचालक अपवित्र आहेत की काय म्हणून सरकारने ‘पवित्र’ पोर्टल निर्माण केले आहे. त्यांना संस्था चालविताना येणार्‍या अडचणी माहीत नाहीत. तासगावचे ए. वाय. कोळेकर म्हणाले, सरकार शिक्षण उद्ध्वस्त करू पाहत असून, शिक्षण संस्था काढल्याचा आता पश्‍चात्ताप होत आहे. राज्य पातळीवर सर्वव्यापी शिक्षण परिषद घेण्यात यावी. मिणचे खुर्दचे आर. व्ही. देसाई म्हणाले, आंदोलनाचे हत्यार उपसल्याशिवाय सरकार जुमानणार नाही.

अध्यक्षीय भाषणात अशोकराव थोरात म्हणाले, पवित्र पोर्टलचे परिणाम शिक्षण व्यवस्थेवर होणार आहेत. यामुळे शिक्षक भरती संस्थाचालकांच्या हातून निसटणार असून, भविष्यात कर्मचारी भरतीही करता येणार नाही. शिक्षकांची बदली कोठेही होण्याचा धोका आहे. भ्रष्टाचाराच्या नावाखाली विनाकारण संस्थाचालकांना बदनाम केले जात आहे. शाळांना 12 टक्के वेतनेतर अनुदान दिल्यास संस्थाचालकांच्या अडचणी कमी होतील.

शैक्षणिक व्यासपीठचे अध्यक्ष एस. डी. लाड यांनी स्वागत केले. याप्रसंगी जिल्ह्यातील संस्थाचालकांनी एक हजार ते पन्‍नास हजार रुपयांपर्यंतचा निधी आंदोलनासाठी दिला. सूत्रसंचालन प्रा. सी. एम. गायकवाड यांनी केले. व्ही. जी. पोवार यांनी आभार मानले. यावेळी रावसाहेब पाटील, मानसिंग बोंद्रे, वसंतराव देशमुख, वीरेंद्र मंडलिक, जी. के. माळी, सुशील पाटील-कौलवकर, सुधाकर निर्मळे यांच्यासह संस्थाचालक उपस्थित होते. 

भरपावसात ‘पवित्र’ पोर्टल आदेशाची होळी

शासनाने शिक्षक भरतीसाठी लागू केलेल्या ‘पवित्र’ पोर्टलप्रणाली आदेशाची भरपावसात पाच जिल्ह्यांतील संस्थाचालकांनी होळी केली. यावेळी शासनाविरोधात घोषणाबाजी करीत यास तीव्र विरोध दर्शविला.