Mon, Jul 22, 2019 03:15होमपेज › Kolhapur › शिष्यवृत्तीचे 23 कोटी रोखले

शिष्यवृत्तीचे 23 कोटी रोखले

Published On: Jun 27 2018 1:20AM | Last Updated: Jun 26 2018 11:30PMकोल्हापूर : अनिल देशमुख

सामाजिक न्याय विभागाच्या वतीने महाविद्यालयांना देण्यात येणारी शिष्यवृत्तीची 23 कोटींची रक्कम रोखण्यात आली आहे. शिष्यवृत्ती वाटपात अनियमितता होत असल्याच्या कारणावरून विशेष तपास पथकाने (एसआयटी) केलेल्या सूचनेवरून ही कारवाई करण्यात आली आहे. एसआयटीच्या चौकशीच्या फेर्‍यात जिल्ह्यातील 400 महाविद्यालये असून, तपास पथकाने त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागवले आहे, त्यानुसार ही रक्कम परत देण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे सामाजिक न्याय विभागातून सांगण्यात आले.

सामाजिक न्याय विभागाकडून अनुसूचित जाती, विशेष मागास प्रवर्ग, मागास प्रवर्ग आणि भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीत अनियमितता होत असून, काही महाविद्यालये त्याचा गैरफायदा घेत आहेत. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. 

विशेष तपास पथकाने जिल्ह्यातील 65 महाविद्यालयांना भेटी देऊन शिष्यवृत्ती संबंधित कागदपत्रांची व सामाजिक न्याय विभागाच्या कार्यालयात दाखल झालेल्या सर्व महाविद्यालयांच्या प्रस्तावांतील कागदपत्रांची तपासणी केली होती. तपासणीनंतर पथकाने महाविद्यालयाला वितरित केली जाणारी सुमारे 23 कोटींची रक्कम रोखून धरण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाला दिले आहेत. यासह यावर्षीच्या रकमेबाबतही अशाच प्रकारची कार्यवाही होण्याची शक्यता आहे.

तपास पथकाने शिष्यवृत्तीची आगाऊ रक्कम, नियमबाह्य शुल्क, नियमबाह्य इतर प्रवर्गातील शिष्यवृत्ती, मान्यता नसलेल्या अभ्यासक्रमासाठीही देण्यात आलेली शिष्यवृत्ती, दुबार विद्यार्थी, कालबाह्य देयके, देयकातील प्रमाणके उपलब्ध नाहीत तसेच नियमबाह्य निर्वाह भत्ता अशा कारणांनी शिष्यवृत्ती रोखून धरली आहे. तपास पथकाने विविध बाबींवर स्पष्टीकरण मागवले आहे. ते प्राप्त होताच, त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. यानंतरच शिष्यवृत्तीची ही रक्कम महाविद्यालयाला मिळणार की नाही हे स्पष्ट होणार आहे.