Tue, Apr 23, 2019 02:33होमपेज › Kolhapur › भाविकांसाठी रस्सीखेच

भाविकांसाठी रस्सीखेच

Published On: Jan 13 2018 1:12AM | Last Updated: Jan 13 2018 12:09AM

बुकमार्क करा
कागल : बा. ल. वंदूरकर

सौंदत्तीच्या यात्रेसाठी कर्नाटक आणि  महाराष्ट्रातील एसटी आगारांमध्ये सध्या भाविकांच्या तिकीट दरावरून रस्सीखेच सुरू आहे. भाविकांना दोन्हींकडून मोठ्या प्रमाणात तिकीट दरामध्ये सवलती दिल्या जात आहेत. कागल एसटी आगाराने, तर यंदा कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने दिलेल्या प्रासंगिक कराराच्या दरापेक्षा प्रतिभाविक 50 रुपयांनी तिकीट दर कमी केले आहेत. तसेच कॅरिअर असलेल्या बसेसही उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य परिवहन बसेसमध्ये सौैंदत्ती यात्रेचे प्रवाशी खेचण्यावरून चढोओढ सुरू आहे.

सौंदत्ती यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यातून दरवर्षी लाखो भाविक जात असतात. या भाविकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र परिवहन विभागांकडून विविध सवलतींच्या योजना राबविल्या जातात. त्याअनुषंगाने यंदाही गावोगावी दोन्ही राज्यांतील परिवहन विभागांचे अधिकारी बैठका घेत आहेत. या बैठका घेऊन मार्गदर्शन करण्यात येत आहे. सवलत योजनांची माहिती दिली जात असून, माहिती पत्रके वाटली जात आहेत. 

पूर्वी सौंदत्ती यात्रेला  जाणार्‍या भाविकांचा केवळ कर्नाटक एसटीचेच बुकिंग करण्याकडे कल असायचा. आता मात्र महाराष्ट्राच्या बसचेदेखील मोठ्या प्रमाणात बुकिंग होत आहे. यामुळे दोन्ही राज्यांच्या परिवहन विभागांत स्पर्धा निर्माण होऊन भाविकांना चांगल्या सोयी, सवलती मिळत आहेत. थेट गावात येऊन ते भाविकांना यात्रेसाठी घेऊन जात आहेत. यासाठी बसस्थानकापासून ते गाव या अंतराचे पैसेदेखील घेतले जात नाहीत.

दरम्यान, गावागावांत यात्रेला जाण्याकरिता दरवर्षी काही जण पुढाकार घेतात. एक ते दोन महिने अगोदरपासूनच यात्रेचे नियोजन ही मंडळी करत असतात. अशा पुढाकार घेणार्‍यांना हाताशी धरून बसेस नोंदविण्याचे काम सध्या सुरू आहे. यासाठी या मंडळींना आमिषेदेखील दाखविली जात आहेत. कागल आगाराकडून बसेस बुकिंग करण्यात सध्या बाजी मारताना दिसत आहे. या आगाराच्या अधिकार्‍यांकडून भाविकांच्या मुलांना शाळेसाठी वर्षभर सवलतीचा पास देतात, तशी सवलत दिली जात आहे. याशिवाय जनतेच्या सेवेला रोज आम्हीच हजर राहतो. मग यात्रेच्या वेळी इतर बसेस बुकिंग का करता, असा सवाल उपस्थित करून भाविकांना इतरांच्या तुलनेत 50 रुपये कमी करून यात्रा बुकिंग सुरू केले आहे.

भाविकांसाठी 34 रुपये प्रतिकिलोमीटर दराने 15 फेबु्रवारीपर्यंत प्रासंगिक करारासाठी खास सवलत देण्यात आली आहे. याशिवाय गाव ते सौंदत्ती या अंतरानुसार खास जादा गाड्या प्रतिसिट भाडे घेऊन सोडण्यात येणार आहेत. त्याचे भाडे जाता-येता कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाने दिलेल्या प्रासंगिक कराराच्या दरापेक्षा प्रतिभाविक सुमारे 50 रुपये कमी केले आहे. तसेच या यात्रेसाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळाने लगेज कॅरिअर असलेल्या बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. अशा प्रकारचे लगेज असलेल्या बसेस कर्नाटक महामंडळाकडे नाहीत. याचाच फायदा कागल आगाराला होणार आहे.