Mon, Jun 24, 2019 16:37होमपेज › Kolhapur › आ. सतेज पाटील यांची आज ‘गोकुळ’वर धडक

आ. सतेज पाटील यांची आज ‘गोकुळ’वर धडक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपये कपात केल्याच्या निषेधार्थ आ. सतेज पाटील हे सोमवारी (दि.27) ‘गोकुळ’वर धडक मोर्चा काढणार आहेत. हा मोर्चा सासने ग्राऊंड येथून सकाळी 11 वाजता ‘गोकुळ’च्या मुख्य कार्यालयावर नेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील दूध उत्पादकांच्या हितासाठी हा मोर्चा असल्याने मोठ्या संख्येने दूध उत्पादकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आ. पाटील यांनी केले आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी पाटील समर्थकांनी जिल्ह्यासह सीमाभागातील दूध उत्पादकांच्या भेटीगाठी घेऊन जनजागृती केली आहे. या मोर्चास किमान पाच हजार उत्पादक शेतकरी उपस्थित राहतील, असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे.

शासन आदेशाविरोधात जात ‘गोकुळ’ दूध संघाने गाय दूध दरात दोन रुपयांची कपात केली आहे. या कपातीमुळे दूध उत्पादकांचे नुकसान होत आहे. ‘गोकुळ’ने ही दर कपात मागे घ्यावी म्हणून संघाला निवेदन देण्यात आले होते. तरीही संघ आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आ. पाटील यांनी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. मोर्चाच्या जाणीवजागृतीसाठी पोस्टर्स, बॅनर्स तयार करून गावोगावी वाटण्यात आली आहेत. तसेच सोशल मीडियावरून ‘गोकुळ’च्या कारभारावर हल्‍लाबोल करण्यात आला आहे. विशेषत: संघाचे नेते महादेवराव महाडिक यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. गेले चार दिवस याच पार्श्‍वभूमीवर आ. सतेज पाटील विरुद्ध महादेवराव महाडिक असा कलगीतुरा रंगला आहे. त्याचे पडसादही या मोर्चात दिसणार आहेत.

महाडिकांच्या पोस्टरची चर्चा
‘गोकुळ’च्या मोर्चानिमित्त महाडिक-पाटील जुगलबंदी सुरू आहे. याचे पडसाद सोशल मीडियातही उमटत आहेत. असेच एक पोस्टर सध्या सर्वत्र व्हायरल झाले आहे. या पोस्टरमध्ये महादेवराव महाडिक हे दुभत्या म्हशीकडे पहात असल्याचे दाखवण्यात आले असून त्यांचा जीव ‘गोकुळ’मध्ये कसा अडकला आहे, हे दर्शवण्यात आले आहे. हे पोस्टर सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने त्याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत आहे.