होमपेज › Kolhapur › ‘त्या’ मनोरुग्णाला अधिकार कोणी दिला : खा. महाडिक

‘त्या’ मनोरुग्णाला अधिकार कोणी दिला : खा. महाडिक

Published On: Sep 02 2018 1:12AM | Last Updated: Sep 02 2018 12:53AMकोल्हापूर : प्रतिनिधी

काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी जनसंघर्ष यात्रेची सुरुवात झाली. त्यात जिल्ह्यात सूर्याजी पिसाळ असलेल्या मनोरुग्णाने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे घ्या, अशी मागणी केली. परंतु, त्यांना हा अधिकार कोणी दिला? असा टोला राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक यांनी काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला. तसेच राज्य आणि देशपातळीवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होत असताना, अशी मागणी करून आघाडीलाच सुरूंग लावण्याचे काम ते करत असल्याचा आरोपही महाडिक यांनी केला.

खा. महाडिक म्हणाले, 2009 मध्येही त्यांनी निवडून आणू, असेच सांगितले होते. परंतु, त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा विश्‍वासघात केला. त्यामुळे जिल्ह्यातील सुज्ञ जनतेनेच त्यांचे सूर्याजी पिसाळ असे नामकरण केले आहे. त्यांची विश्‍वासार्हता काय? गेली 15 वर्षे हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आघाडीबाबत चर्चा झाली असून, लोकसभा निवडणूक एकत्रित लढण्याचे ठरले आहे. त्यानुसार लोकसभा निवडणुकीसाठीचे जागा वाटप देशपातळीवर होणार आहे. पवार हे देशभर केंद्र सरकारविरोधात प्रचार करत फिरत आहेत. मग पवार यांनाच त्यांचा विरोध आहे का? असेही पाटील यांचे नाव न घेता महाडिक म्हणाले.