Fri, Mar 22, 2019 07:59होमपेज › Kolhapur › जनसंघर्ष यात्रेतून सरकारचा पर्दाफाश

जनसंघर्ष यात्रेतून सरकारचा पर्दाफाश

Published On: Aug 29 2018 1:42AM | Last Updated: Aug 29 2018 1:04AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

केंद्र व राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत जनतेची जी फसवणूक केली, त्याचा पर्दाफाश करण्यासाठी काँगे्रसच्या वतीने 31 ऑगस्टपासून जनसंघर्ष यात्रा काढण्यात येणार असून, त्याची सुरुवात 31 ऑगस्ट रोजी कोल्हापुरातून होईल, अशी माहिती माजी मंत्री व आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. सरकारच्या कामाचा पंचनामा करताना काँगे्रसच्या आगामी निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभही असेल, असेही त्यांनी सांगितले. 

पाटील म्हणाले, काँगे्रसच्या वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर झालेल्या बैठकीत सरकारविरोधात जनसंघर्ष यात्रा काढून  जनजागृती करण्याचा निर्णय झाला. त्याची सुरुवात कोल्हापुरातून करावी का, अशी विचारणा झाल्यानंतर आम्ही त्याला होकार दिला. ही भूमी शाहू महाराजांची आहे. समतेचा संदेश देणारी व परिवर्तनाची नांदी देणारी असल्याने कोल्हापुरातूनच या यात्रेची सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात गणेशोत्सवापूर्वी कोल्हापूरसह सांगली, सोलापूर, सातारा व पुणे जिल्ह्यात यात्रा जाईल. संपूर्ण यात्रा नोव्हेंबर 2018 पर्यंत चालेल. त्यानंतर विधानसभा, लोकसभेचे अधिवेशन असते. त्यानंतर केव्हाही लोकसभा निवडणुका लागण्याची शक्यता असल्याने ते गृहीत धरून यात्रेचे नियोजन केले आहे. 

ते म्हणाले, केंद्र व राज्य सरकारने गेल्या चार वर्षांत केलेल्या चुका, त्यातून सामान्यांबरोबरच उद्योजक, शेतकरी यांना सोसाव्या लागलेल्या हालअपेष्टा याची जनजागृती  यात्रेतून करण्यात येईल. त्याशिवाय जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशीही मागणी करण्यात येणार आहे. यावेळी संघर्ष यात्रा लोगोचे अनावरण  करण्यात आले.  पत्रकार बैठकीला शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, माजी आमदार दिनकरराव जाधव, संजीवनी गायकवाड, महिला काँगे्रसच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळोखे, शहराध्यक्ष संध्या घोटणे, सरचिटणीस प्रकाश सातपुते, तौफिक मुल्लाणी, गोकुळचे संचालक राजेश पाटील, अ‍ॅड. गुलाबराव घोरपडे, दीपा पाटील आदी उपस्थित होते.

अशी असेल जनसंघर्ष यात्रा 
31 ऑगस्ट- 10 वाजता आगमन, ताराराणी चौकात स्वागत. 12 वा. केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यकर्ता मेळावा. 5 वा. साई मंदिर, कळंबा येथे सभा 
1 सप्टेंबर  : सकाळी 10 वाजता हातकणंगलेत सभा. दुपारी 12 वाजता शिरोळ येथे सभा. इचलकरंजीतील सभेनंतर सायंकाळी सांगलीला रवाना.