Thu, Aug 22, 2019 14:32होमपेज › Kolhapur › शहरातील सातबारा बंद होणार : जमाबंदी आयुक्‍त

शहरातील सातबारा बंद होणार : जमाबंदी आयुक्‍त

Published On: May 16 2019 2:05AM | Last Updated: May 16 2019 1:52AM
कोल्हापूर : अनिल देशमुख

शहरी भागातील बिगरशेती झालेले सर्व सातबारा उतारे बंद करण्यात येणार आहेत, त्याऐवजी मिळकत पत्रिका (प्रॉपर्टी कार्ड) देण्यात येणार आहे. त्याची कोल्हापुरात प्रक्रिया सुरू आहे. 
चार हजार सातबारा बंद करण्यात आले असून, अडीच हजार सातबार्‍यांची तपासणी सुरू आहे, यासह टप्प्याटप्याने शहरातील उर्वरित सर्व सातबारा बंद करून, त्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड दिली जातील, असे राज्याचे प्रभारी जमाबंदी आयुक्‍त ओमप्रकाश देशमुख यांनी सांगितले. ऑनलाईन प्रॉपर्टी कार्डचे काम ऑगस्टअखेर पूर्ण होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहरात अनेक ठिकाणी अद्याप मिळकतींचा सातबारा आहे. त्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड व्हावे, अशी नागरिकांची मागणी आहे. यामुळे बिनशेती झालेला प्रत्येक सातबारा तातडीने बंद करावा आणि त्याचे प्रॉपर्टी कार्ड तयार करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. बिनशेती झाल्यानंतर तत्काळ बिनशेती झाल्याने सातबारा बंद, असा शेराच सातबारा उतार्‍यावर मारण्यात यावा, त्यानंतर सि.स.नं.करिता असे उतारे नगरभूूमापन कार्यालयाला सादर करावेत, अशा सूचना आहेत.

कोल्हापूर दौर्‍यावर आलेल्या देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कोल्हापूर शहरात साडेसहा हजार सातबारांचे प्रॉपर्टी कार्ड करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, त्यापैकी चार हजार सातबारा बंद करून त्यांची कार्डे तयार करण्यात आली आहेत. उर्वरित उतारे तपासणीसाठी तहसीलदारांकडे पाठविण्यात आले आहेत. तपासून आल्यानंतर त्यांचीही कार्डे तयार होतील, असे देशमुख यांनी सांगितले.
ऑनलाईन प्रॉपर्टी कार्डचे काम ऑगस्टअखेर पूर्ण जिल्ह्यात ऑनलाईन प्रॉपर्टी कार्डचे काम सुरू आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यात आहेत. ते येत्या ऑगस्टअखेर पूर्ण होईल. यानंतर नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने डिजिटल सहीचे प्रॉपर्टी कार्ड घरबसल्याही उपलब्ध होणार आहे.

जूनपासून जिल्ह्यातील दहा गावांची ड्रोनद्वारे मोजणी
राज्यात ड्रोनद्वारे गावठाणाची मोजणी केली जाणार आहे. याकरिता सर्व्हे ऑफ इंडिया ही एजन्सी नियुक्‍त केली आहे. या कंपनीने मोजणीसाठी आवश्यक ड्रोन कॅमेरे घेतले आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील दहा गावांची पहिल्या टप्प्यात मोजणी केली जाणार आहे. जिल्ह्यात जूनपासून या मोजणीला प्रारंभ होणार आहे. त्याकरिता दहा गावे आणि तारीख येत्या चार-पाच दिवसांत निश्‍चित होईल, असेही देशमुख यांनी सांगितले.

सर्व्हेअरची रिक्‍त पदे भरणार
सध्या ई-मोजणी केली जाते. मात्र, सर्व्हेअर, शिपाई पदाच्या जागा रिक्‍त आहेत. याचा परिणाम मोजणीवर होतो. मोजणी लवकर व्हावी, याकरिता राज्यातील सर्व्हेअरची 450 रिक्‍त पदे भरली जाणार आहेत. यापैकी 47 पदे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत, ती सर्व लवकरच भरली जातील. त्याकरिता महापरीक्षा विभागाकडून ऑनलाईन परीक्षा होणार आहे.