होमपेज › Kolhapur › संत गोरा कुंभार वसाहत बनली ‘रोजगार हब’

संत गोरा कुंभार वसाहत बनली ‘रोजगार हब’

Published On: Sep 02 2018 1:12AM | Last Updated: Sep 02 2018 12:21AMकोल्हापूर : प्रिया सरीकर

कुंभार काम विशेषत: मूर्तिकाम आजवर केवळ कुंभार समाजच करीत होता. पण गेल्या काही वर्षांत मूर्तिकामाला पूरक कामासाठी सर्व समाजाचे हात मदतीला येऊ लागल्याचे चित्र आहे. कारण मूर्तिकामातून हजारो हातांना रोजगार मिळाला आहे. कोल्हापुरातील संत गोरा कुंभार वसाहतीनेही जवळपास दोन हजार लोकांना मूर्तिकामाच्या व्यवसायात सहभागी करून घेतले आहे. अनेक बेरोजगार तरुणांनीही मूर्तिकामाचा पर्याय निवडल्याने संत गोरा कुंभार वसाहतीला ‘रोजगार हब’चे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यासह, नगर, नांदेड, पुणे येथूनही कामासाठी लोक कोल्हापूरकडे धाव घेत आहेत.


गेल्या दहा बारा वर्षांत कोल्हापूरच्या मूर्तिकामाचे स्वरूप बदलत गेले. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक अशा तीन राज्यांत कोल्हापूरच्या गणेश मूर्तींना मागणी होत असल्याने मूर्तिकाम प्रचंड प्रमाणात वाढले. 9 इंचाच्या गणेशमूर्तीपासून 11 फुटांपर्यंतच्या लाखों गणेशमूर्ती कोल्हापुरात तयार होऊ लागल्या. व्यवसायाची गरज ओळखून कुंभार बांधवांनीही मदतीला हात घेतले. आज संत गोरा कुंभार वसाहतीमध्ये कुंभार बांधव वगळून दोन हजार हात मूर्तिकामात रंगल्याचे चित्र आहे. यामध्ये गणेश मूर्ती साकारण्यापासून ते रंगकामातील सर्व बारकावे टिपण्यात अनेकजण माहीर झाले आहेत. दिवसाकाठी 150 पासून 1000 रुपये रोजगार मिळवणारे अनेक कारागीर याठिकाणी राबताना दिसतात. कोल्हापूर शहरातील उपनगरासह उचगाव, म्हारुळ, उदगाव अशा ग्रामीण भागातून रोज संत गोरा कुंभार वसाहतीत कामासाठी येणार्‍यांची संख्याही मोठी आहे. याठिकाणी कामाचे स्वरुपही ऐच्छिक आहे. मूर्ती कास्टिंग कराणार्‍याला मूर्तीच्या आकारमानावर प्रत्येक मूर्तीसाठी स्वतंत्र दर ठरवून रोजगार दिला जातो. मूर्ती पॉलिशिंग, टचिंग, व्हाईटनिंग, रंगकाम, नक्षीकाम, सोनेरी अशा अनेक टप्प्यांत काम करण्याची संधी मिळते. इथे काम करणार्‍यांमध्ये महिलांची संख्याही मोठी आहे.

संत गोरा कुंभार वसाहतीत मूर्तिकामाची दोनशे शेड आहेत. प्रत्येक ठिकाणी कुंभार बांधव सोडून आठ ते दहा कारागीर काम करीत आहेत. त्यांना मूर्तीच्या उंचीनुसार पैसे दिले जातात. उदा. दीड फूट मूर्ती कास्टिंगसाठी 35 ते 40 रु. प्रति मूर्ती, टचिंग, फिनिशिंग, कलरकामासाठी 30 रु. प्रति मूर्ती, तीन फुटांची मूर्ती असेल तर कास्टिंगसाठी 100 ते 125, आठ फूट असेल तर 800 ते 1000 रुपये दिले जातात. त्यामुळे मिळेल ते काम करण्यासाठी अनेक हात पुढे येतात, असे संत गोरा कुंभार मूर्तिकार संघाचे सचिव अनिल निगवेकर यांनी सांगितले.