Wed, Aug 21, 2019 14:50होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : मंडलिक-श्रीपतराव शिंदे ‘चाय पे चर्चा’

कोल्हापूर : मंडलिक-श्रीपतराव शिंदे ‘चाय पे चर्चा’

Published On: Feb 08 2018 1:44AM | Last Updated: Feb 08 2018 4:46PMगडहिंग्लज ः प्रवीण आजगेकर

गडहिंग्लज तालुक्याच्या राजकारणामध्ये जनता दलाचा मोठा वरचष्मा असून गडहिंग्लज शहरामध्ये जनता दलाची एकहाती सत्ता आहे. याशिवाय तालुक्यातील सर्वच गावांमध्ये जनता दलाची तुल्यबळ ताकद असल्याने गडहिंग्लज तालुक्याचे राजकारण करताना जनता दलाला सोबत घेतल्याशिवाय बेरजेचे राजकारण होत नाही. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या खासदारकीचा रण चांगलाच रंगला असून अनेक कार्यक्रमांमधून याचे प्रत्यय येत आहेत. गडहिंग्लजलाही बुधवारी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी गोडसाखरच्या साखर पूजन कार्यक्रमामध्ये हजेरी लावून कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांच्याबरोबरच ‘चाय पे चर्चा’ केली. ही चर्चा आजच्या घडीला नॉर्मल असली तरी प्रा. मंडलिक व अ‍ॅड. शिंदेंची जवळीक ही महाडिकांसाठी धोक्याची घंटा आहे.

कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रा. संजय मंडलिक यांना खासदार करण्याचा विडा उचलला असून गेल्या महिनाभरामध्ये जेथे संधी मिळेल तेथे हसन मुश्रीफ यांनी प्रा. मंडलिकांना खासदारकी मिळवून देणारच, अशा घोषणा केल्या आहेत. यासाठी त्यांनी त्यांच्या पक्षाचे सध्या नेतृत्व करीत असलेले खासदार धनंजय महाडिक यांना बेदखल करीत प्रा. मंडलिकांसाठी आवश्यक त्या जोडण्या लावण्यास प्रारंभ केला आहे. 

गडहिंग्लजचा आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना हा आर्थिक अडचणीत आल्यानंतर आमदार मुश्रीफ यांनी त्यांच्या माध्यमातून ब्रिक्स कंपनीला चालविण्यास दिला असला तरी या ठिकाणचे सगळेच नियोजन आ. मुश्रीफांचे असते. याच कारखान्याच्या निवडण्ाुकीत आ. मुश्रीफ व अ‍ॅड. शिंदे यांची धक्‍कादायक युती होऊन या कारखान्यावर या दोघांनी सत्ताही मिळविली. कारखान्याच्या चेअरमनपदावर अ‍ॅड. शिंदे यांची निवड झाल्यानंतर त्यांना पायउतार केल्याचे अतिव दुःख झाल्याचे सांगून पुन्हा त्यांना खुर्ची दिल्यानंतर समाधान झाल्याचेही त्यावेळी मुश्रीफांनी स्पष्ट केले होते.

या कारखान्यामध्ये विविध कार्यक्रम होत असतात. या कार्यक्रमांना अ‍ॅड. शिंदे यांच्यासह आ. मुश्रीफांचीही हजेरी सातत्याने असते. याशिवाय कारखान्याचा कारभार मुश्रीफांकडूनच होत असल्याने बुधवारी झालेल्या साखर पोतीपूजनाला त्यांनी थेट प्रा. संजय मंडलिक यांना आमंत्रण देत आणखी एक बेरजेचे राजकारण केले आहे. अ‍ॅड. शिंदे यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत महाडिक यांची साथ दिल्याने आगामी खासदारकीच्या द‍ृष्टीने प्रा. मंडलिक व अ‍ॅड. शिंदेंमध्ये स्नेहसंबंध निर्माण करण्यासाठीच जणू हे आमंत्रण होते. 

या कार्यक्रमात अ‍ॅड. शिंदे यांनी मंडलिक घराण्याशी असलेला आपला पूर्वीपासूनचा घरोबा स्पष्ट करीत स्व. सदाशिवराव मंडलिकांच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमात प्रा. संजय मंडलिक यांनीही शिंदे यांच्यासमवेत असलेल्या स्नेहसंबंधांचा खुलासा करीत आगामी काळात सहकार्याचे आवाहन केले. या दोन्ही गोष्टींमुळे आगामी खासदारकीच्या निवडणुकीत मुश्रीफांनी आणखी एक बेरजेचे पाऊल उचलले असून त्यांचे हे बेरजेचे पाऊल योग्य पडल्यास महाडिकांच्या राजकारणात मात्र वजाबाकी होणार आहे.

अ‍ॅड. शिंदे आगामी खासदारकी व आमदारकीला कोणाला साथ देतात, यावरही बरेच काही अवलंबून असून शहरासह तालुक्यातील त्यांच्या मताला राजकारणात फार मोठे महत्त्व आहे. ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांचे आगामी विधानसभेसाठी चाललेले दौरे, यामधून निर्माण होणार धोका तसेच खासदारकीला आ. मुश्रीफांनी डोक्यात ठेवलेले धोरण हे सगळे सत्यात उतरण्यासाठी त्यांनी सुरू केलेल्या या नव्या पर्वामुळे अनेक घडामोडी होणार आहेत.

अ‍ॅड. शिंदेंची साथ कुणाला...

अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांचे तालुक्यावर वर्चस्व असून मागील विधान परिषदेवेळी ते महाडिकांसोबत होते. कारखाना निवडणुकीत त्यांनी आमदार मुश्रीफांची साथ घेत कारखान्याची निवडणूक जिंकली. तर नगरपालिका निवडणुकीत मुश्रीफांविरोधात लढून स्वबळावर सत्ता राखली होती. महाडिकांचे व शिंदे यांचे स्नेहसंबंधही अलीकडे सुधारलेले असून आगामी खासदारकी व विधानसभेला ते कोणाची साथ देतात, यावर बरेच काही अवलंबून आहे.