Mon, Jul 22, 2019 03:21होमपेज › Kolhapur › जनतेच्या सेवेसाठी हजारदा प्रोटोकॉल तोडेन

जनतेच्या सेवेसाठी हजारदा प्रोटोकॉल तोडेन

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 08 2018 10:29PMहमीदवाडा : प्रतिनिधी

प्रोटोकॉल म्हणजे प्रथा व प्रथा म्हणजे काही शासकीय जीआर नव्हे. छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्यतेबाबतची प्रथा म्हणजेच प्रोटोकॉल तोडत गंगाराम कांबळे यांच्या हॉटेलमध्ये चहा घेतला. त्यांचाच विचार पुढे नेताना जनतेच्या सेवेसाठी हजारदा प्रोटोकॉल तोडण्यासही आम्ही तयार आहोत, असे प्रत्युत्तर म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी आमदार मुश्रीफ यांचा नामोल्लेख न करता केले.

विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्याबाबत प्रोटोकॉल पाळावा व संघर्ष टाळावा. असे प्रतिपादन आमदार मुश्रीफ यांनी केले होते. त्या अनुषंगाने घाटगे यांनी सदरचे विधान केले. हमीदवाडा (ता. कागल) येथे जलयुक्त अंतर्गत कृषी विभागाच्या वतीने 70 लाख लिटर क्षमतेच्या बांधण्यात येणार्‍या बंधार्‍याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सुमन विलास जाधव होत्या.

यावेळी समरजितसिंह घाटगे व  नवोदिता घाटगे यांच्या हस्ते बंधार्‍याच्या भूमिपूजनाचा विधीवत कार्यक्रम पार पडला. उपसरपंच शिवाजी मोरबाळे यांनी पाणी व  रस्त्याच्या प्रश्‍नांबाबत सहकार्य करण्याची विनंती आपल्या घाटगे यांच्याकडे केली. यावेळी बिद्रीच्या संचालिका  नीताराणी सूर्यवंशी, माजी उपाध्यक्ष दत्तात्रय खराडे, प्रताप पाटील, उमेश देसाई यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.