होमपेज › Kolhapur › सामाजिक सलोखा अखंड राखण्याचा निर्धार

सामाजिक सलोखा अखंड राखण्याचा निर्धार

Published On: Mar 12 2018 1:30AM | Last Updated: Mar 12 2018 12:44AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दूरद‍ृष्टीने दिलेला समतेचा विचार जपण्याबरोबरच सामाजिक सलोखा अखंड राखण्याचा निर्धार रविवारी कोल्हापुरात 85 समाज संघटनांच्या वतीने करण्यात आला. इतकेच नव्हे, कोल्हापुरात निर्माण होणारा विचार संपूर्ण महाराष्ट्रात पसरतो आणि तो देशपातळीपर्यंत पोहोचतो, अशी परंपरा असल्याने कोल्हापूरची वेगळी ओळख असणार्‍या  पुरोगामित्वाचा वारसा जपण्यासाठीही सर्वतोपरी प्रयत्न करण्याची ग्वाहीही प्रत्येक समाजातील प्रतिनिधीने दिली. देशाचा तिरंगा ध्वज फडकावून आणि राष्ट्रगीत गाऊन राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन दसरा चौकातील राजर्षी शाहू स्मारक भवनात दाखवून दिले. 

सामाजिक समतेचा कृतिशील प्रयोग राजर्षी शाहू महाराज यांनी इसवी सन 1917 मध्ये कोल्हापुरात राबविला होता. समाजाने अस्पृश्य म्हणून बाजूला केलेल्या गंगाराम कांबळे यांना सत्यसुधारक हॉटेल काढून देत राजर्षी शाहूंनी आपल्या सरदार-मानकर्‍यांसोबत येथे चहा पिण्याची प्रथा पाडली. समाज सुधारणेच्या या ऐतिहासिक घटनेच्या शताब्दीनिमित्त राजर्षी शाहू सामाजिक सलोखा मंचतर्फे राजर्षी शाहू समता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. परिषदेची सुरुवात राजर्षी शाहूंच्या पुतळा व गंगाराम कांबळे यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, शहाजी कांबळे, सुरेश शिपूरकर, प्रा. विश्‍वासराव देशमुख, पापाभाई बागवान यांच्या उपस्थितीत आणि अ‍ॅड. सरलाताई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद झाली. 

अध्यक्षीय भाषणात सरलाताई पाटील यांनी, भारताची वाटचाल पुन्हा एकदा मनुवादाकडे चालली आहे. हे चित्र बदलण्यासाठी महात्मा बसवेश्‍वर, गौतम बुद्ध, शिवछत्रपती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पुरोगामी आणि मानव धर्माचा पुरस्कार करणार्‍या विचारांची गरज असल्याचे नमूद केले. 

शाहू विचारांच्या रश्श्याची गरज : महाराव 

तांबडा-पांढरा रस्सा कोल्हापूरच्या खाद्य संस्कृतीचे वैशिष्ट्य असेल;  पण केवळ खाणे-पिणे म्हणजेच सर्वस्व नाही. या खाद्य संस्कृतीच्या आडून विचार संस्कृती मारण्याचा प्रकारही कोल्हापुरात सुरू आहे. वास्तविक, कोल्हापूरकरांना शाहूंच्या विचारांच्या रश्श्याची गरज असून, तोच पिण्याचे आवाहन ज्ञानेश महाराव यांनी केले.  प्रांतवाद, भाषावाद, आहारवाद अशा अनेक वादांतून आणि मतभेदांमुळे जाती-धर्मांतील भेद आणि विचारांची दरी अधिकच वाढली आहे. हे चित्र बदलण्यासाठी लोकराजा राजर्षी शाहूंचे विचार काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. महाराव म्हणाले, आज पुरोगामी महाराष्ट्रात चांगल्या विचारांचे विकृतीकरण केले जात आहे. साधू-महाराज, बुवा यांची चलती आहे. त्यांच्या नावाने वेगवेगळे ट्रस्ट काढून काळ्याचा पांढरा पैसा निर्माण केला जात आहे.

पूर्वी संत ज्ञानेश्‍वर, तुकाराम असे अनेक संत होऊन गेले. त्यांच्या नावे कोणताही ट्रस्ट निघाला नाही. कारण, लोकांचा त्यांच्यावर ट्रस्ट (विश्‍वास) होता. आज शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार बाजूला पडल्याने भीमा-कोरेगावसारख्या घटना घडू लागल्या आहेत. भिडे-एकबोटे यांच्यासारखे लोक अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊनही बिनधास्त फिरत आहेत. बहुजन समाजाने अशा लोकांपासून सावध राहण्याचा इशाराही त्यांनी दिला. लाचारीऐवजी खरे बोलण्याचा सल्लाही त्यांनी दिला. राजर्षी शाहूंना अपेक्षित असणार्‍या माणूस या एकमेव जातीचा पुरस्कार करण्याचे त्यांनी आवाहन केले.  

शिक्षण, आरोग्य, शेतीला प्राथमिकता गरजेची : डॉ. कुंभार 
सत्काराला उत्तर देताना प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार म्हणाले, देशात सध्या समतेचे विचार दडपले जात आहेत. अविश्‍वास, संशय, द्वेशाचे वातावरण गेल्या तीन वर्षांपासून वाढत आहे. भारतीय संविधानानुसार भारत (इंडिया) अशी देशाची ओळख असताना हिंदुस्थान नावाचा आग्रह धरला जात आहे. याऐवजी आज जगण्यासाठी अत्यावश्यक असणार्‍या शिक्षण, आरोग्य व शेतीला प्राथमिकता देणे गरजेचे आहे. 

राजर्षी शाहूंचे विचार संपविण्याचे प्रयत्न : इंद्रजित सावंत
देशाला अभिमान असणार्‍या राजर्षी शाहूंचे विचार संपविण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. खुद्द शाहूनगरी कोल्हापुरातही हा प्रकार सुरू आहे. शाहू जन्मस्थळ, शाहू समाधीस्थळ, रेल्वेस्टेशनसमोरील हुजूर रेस्ट हाऊस, सोनतळी बंगला अशी अनेक उदाहरणे सावंत यांनी दिली. पुरोगामी कोल्हापुरातील पेठा-पेठांत शाहू विचार रुजविण्याबरोबरच राज्य आणि राष्ट्रीयस्तरावर ते पोहोचावेत, यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रत्येक कोल्हापूरकराने योगदान द्यावे, असे आवाहन युवा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केले. 

तत्पूर्वी, स्वागत-प्रास्ताविक सहनिमंत्रक बबनराव रानगे यांनी केले. ही परिषद म्हणजे गुजरातच्या चाय पे चर्चेसारखी नसून, सामाजिक सलोखा जपणार्‍या गंगाराम कांबळे यांच्या सत्यसुधारक हॉटेलमधील किटलीसारखी असल्याचा टोला लगावला. परिषदेची संकल्पना सांगताना निमंत्रक वसंत मुळीक यांनी समाजातील तेढ सोडवून एकोप्याची वीण घट्ट व्हावी, या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सुदाम साबळे (सोनाळी-कागल), झाडू कामगार कवी विजय शिंदे यांनी समतेच्या कविता सादर केल्या.  सूत्रसंचालन पंडित कंदले यांनी केले, तर आभार सोमनाथ घोडेराव यांनी मानले. 

मोठा पोलिस बंदोबस्त
काही महिन्यांपूर्वी कोल्हापुरातील एका कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव यांनी खासदार संभाजीराजे  यांच्यावर टीका केली होती. याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून खा. संभाजीराजे यांचे समर्थक शाहू स्मारक भवनात मोठ्या संख्येने जमले होते. यामुळे सभागृहाच्या आत व बाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

राजर्षी शाहू समता पुरस्काराचे मानकरी...
परिषदेच्या निमित्ताने राजर्षी शाहूंच्या आचार-विचारांचा कृतिशील वारसा जपणार्‍या पाच व्यक्‍तींना राजर्षी शाहू समता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात देवदासी चळवळीचे नेते प्रा. विठ्ठल सिद्धाप्पा बन्‍ने, ज्येष्ठ समाजसेवक बापूसोा देवाप्पा कांबळे, पुरोगामी विचारांचा वारसा जपणारे माजी महापौर भीकशेठ ज्ञानदेव पाटील, कृतिशील पुरोगामी विचारवंत प्राचार्य डॉ. राजेंद्र कुंभार आणि शाहू विचारांचे व्यक्‍तिमत्त्व गणेश बाबू काळे यांचा समावेश होता. 

ऐतिहासिक किटलीचे आकर्षण...
शाहूभक्‍त गंगाराम कांबळे यांच्या सत्यसुधारक हॉटेलमध्ये राजर्षी शाहूंनी आपले सरदार व मानकरी यांच्यासोबत बसून ज्या किटलीतील चहा प्यायला ती किटली आणि हॉटेलमधील छोटे टेबल विचारपीठावरील राजर्षी शाहूंच्या पुतळ्याशेजारी ठेवण्यात आले होते. कांबळे कुटुंबीयांनी या ऐतिहासिक महत्त्व आणि मोल असणार्‍या वस्तूंचे जतन-संवर्धन केल्याबद्दल त्यांचा विशेष गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यात लीलाबाई भास्कर-कांबळे, राजेंद्र कांबळे, अरुण कांबळे यांचा समावेश होता.