Tue, Jul 23, 2019 02:00होमपेज › Kolhapur › ब्लॉग : सुभेदारीसाठी शेतकरी चळवळ भरकटतेय

ब्लॉग : सुभेदारीसाठी शेतकरी चळवळ भरकटतेय

Published On: Feb 27 2018 11:10AM | Last Updated: Feb 27 2018 11:12AMदत्तकुमार खंडागळे

शेतकऱ्यांसाठी सत्तेशी लढणारे आज परस्परांच्यावर दगड भिरकावू लागले आहेत. संघटनेच्या उद्देशापासून भरकटले आहेत. शेतकऱ्याला न्याय हा उद्देश आता राहिला नाही तर, सत्ता हेच ध्येय आणि सत्ता हाच न्याय झाला आहे. त्यामुळं स्वत:ला शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्या नेत्यांच्यात यादवी माजली आहे. ही यादवी शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारी आहे. नेत्यांच्यातील यादवी संघटणला विनाशाकडे नेईल का?  असा प्रश्न पडल्याशिवाय रहात नाही.

यादव जसे आप-आपसात लढून संपले, नष्ट झाले. कदाचित शेतकरी संघटनेचे तसेच होऊ शकते. सध्या तशीच वाटचाल सुरू आहे. शेतकरी मंत्रालयात आत्महत्या करत आहेत आणि शेतकऱ्यांचे नेते म्हणवणारे आप-आपसात लढण्यात दंग आहेत. शेतकरी अडचणीत असताना नेते यादवीत दंग आहेत.

स्वाभिमानीच्या शेतकरी संघटनेच्या माढ्यातील कार्यकर्त्यांनी कृषी राज्यमंत्री सदाशिव खोतांना रोखले. त्यांच्या गाडीवर दगड भिरकावले. इकडे इस्लामपुरात सदाभाऊ खोतांच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यालय फोडले व राजू शेट्टींचा प्रतिकात्मक पुतळा जाळला. त्यानंतर दोघेही एकमेकांवर घसरले आहेत. परस्परांवर टिका करत आहेत.  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जीवाभावाने लढणारे हे दोन मित्र आज कट्टर वैरी झाले आहेत. दोघे एकत्र असताना दोघांचा समान शत्रू होता. त्याच्याशी ते ताकदीने लढत होते. शेतकऱ्यांसाठी दोघे धनाजी-संताजी होते. दोघांची ताकद विरोधकांची पळता भुई थोडी करत होती. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्याला न्याय देण्याच्या भूमिकेने दोघे भाजपबरोबर गेले. सत्तेच्या दरवाजातून आत गेले. भाजपने दोघांनाही शब्द दिला होता. पण, शेवटी भाजप तो भाजपच. भाजपने बरोबर त्यांच्यात फूट पाडली. डोईजड होणारी ताकद विभागली.

चौथी-पाचवीत असताना जयवंत सावळजकरांचा तमाशा पाहिला होता. त्या तमाशातील एक प्रसंग आवर्जून या ठिकाणी आठवतो आहे. दोन जीवलग मित्र होते. त्यांचा दोस्ताना पंचक्रोशीत प्रसिध्द होता. त्यांच्यात कोणीच फूट पाडू शकत नव्हते. मग हे काम करण्याची जबाबदारी एक महिला घेते. ती या दोन मित्रांच्याकडे जाते. त्यातल्या एकाला बाजूला बोलावून घेते अन् एकच वाक्य उच्चारते की, "मी जे काही बोलणार आहे ते कुणालाही सांगू नकोस !" एवढंच बोलते अन् अतिशय लडीवाळपणे त्याला इशारा करून ती निघून जाते. दुसऱ्या मित्राला ती काय म्हणाली हे ऐकण्याची खूप उत्सुकता असते. म्हणून तो लगेच आपल्या मित्राला विचारतो की, " अरे ती असं बाजूला घेऊन तुला काय सांगत होती? यावर तो मित्र म्हणतो की, " काही नाही ती म्हणाली, मी जे काही सांगतेय ते कुणाला सांगू नकोस !"  यावर तो दुसरा मित्र म्हणतो, "मला सांग ना मी तुझा खूप जवळचा मित्र आहे !" परत पहिला मित्र म्हणतो की, "ती हेच म्हणाली की मी जे काही सांगणार आहे ते कुणालाही सांगू नकोस !" यावर दोघात कडाक्याचे भांडण होते. दुसरा मित्र म्हणतो, "मी इतका जवळचा मित्र आणि आत्ता आलेल्या बाईसाठी माझ्याशी गद्दारी करतोस. ती काय बोलली हे मला सांगत नाहीस !" एका बाईच्या चातुर्याने दोघांत बेबनाव होतो. दोघे परस्परांच्या अंगावर धावून जातात. दोन जीवाभावाचे मित्र परस्परांचे वैरी होतात.

राजू शेट्टी अन् सदाभाऊ खोत यांच्यात काहीसे असेच झाले आहे. फडणवीस नावाच्या सत्ता सुंदरीने त्यांच्यात बेबनाव निर्माण केला आहे. त्या तमाशासारखेच फडणवीसांनी तंत्र वापरले अन हे दोघे त्याला बळी पडले. आज परस्परांचे पुतळे जाळण्यापर्यंत दोघांच्यातले वैर वाढले आहे. "जर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिला तर, आपण हातकणंगले मतदारसंघातून राजू शेट्टींच्या विरोधात लढू !" असे सदाभाऊ खोतांनी जाहीर केले आहे. धनाजी-संताजीतला बेबनाव ज्याप्रमाणे मराठी सत्तेचे नुकसान करणारा ठरला. त्याप्रमाणेच या दोघांच्यातील संघर्ष शेतकरी चळवळीचे नुकसान करणारा ठरतो आहे. 

सध्या शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. ऊस आंदोलनातून दोघांचेही नेतृत्व उभे राहिले. शेतकऱ्यांनी या दोघांना डोक्यावर घेतले. प्रचंड ताकद दिली, पैसा दिला. माढा मतदार संघात सदाभाऊ खोतांना संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केवळ मतंच नव्हे तर, वर्गणी काढून पैसाही दिला. घरच्या भाकरी खाऊन आणि बांधून नेऊन सदाभाऊ खोतांचा प्रचार-प्रसार केला. त्या ताकदीवरच सदाभाऊ खोतांनी विजयसिंह मोहिते-पाटलांना जेरीस आणले. त्या निवडणुकीत खोतांचा निसटता पराभव झाला. खोत इस्लामपूरचे पण माढ्यातल्या कार्यकर्त्यांनी प्रचंड ताकद दिली, मते दिली. पण, सत्ता आल्यानंतर खोत तिकडे फिरकले नाहीत. मधल्या काळात शेतकरी आंदोलन राज्यभर पेटले होते. त्या वेळी खोतांची भूमिका शेतकऱ्यांच्या बाजूची असायला पाहिजे होती. पण ती सरकार धार्जिणी होती. खोत मंत्री झाल्यावर संघटनेपासून दुरावले अन मुख्यमंत्र्यांच्या अधिक जवळ गेले. त्यामुळे त्यांची भूमिका अन् संघटनेची भूमिका यात अंतर पडत गेले.\

या सगळ्याचा राग संघटणेच्या कार्यकर्त्यांच्या मनात ठसठसत होता. विशेषता माढा मतदार संघात सदाशिव खोतांनी गद्दारी केल्याची भावना जास्त आहे. त्यांच्याबद्दल प्रचंड उद्रेकही आहे. त्या मतदारसंघात फिरताना तो पाहिला आहे. लोकांनी तन, मन व धन देवून खोतांना ताकद दिली. त्यांच्यासाठी जीवाचे रान केले. मोहिते-पाटलांसारख्या शक्तीशी पंगा घेतला आणि पदरात गद्दारी आली अशी तिथल्या कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यातूनच परवाची दगडबाजी झाली आहे. 

एकेकाळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बँका पेटवा, गाड्या फोडा म्हणून सांगणाऱ्या सदाभाऊ खोतांच्या गाडीवरच दगड पडावेत, त्यांचीच गाडी फोडली जावी. याला काय म्हणायचे? आज ऊसाच्या दराची बोंब होण्याची चिन्हे दिसत आहेत. कारखान्यांनी जेवढा दर घोषित केला होता तेवढा दिला नाही. शेतकरी कर्जमाफीचा बट्ट्याबोळ जगजाहीर आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकऱ्याला झुलवले आहे. ८२ वर्षांचा शेतकरी मंत्रालयात जाऊन विष पितो. आत्महत्या करतो. शेतकऱ्यांच्या आत्महत्या पूर्वीप्रमाणेच सुरू आहेत. अशा स्थितीत शेतकरी नेत्यांच्यातला हा संघर्ष शेतकरी चळवळीचा घात करणारा आहे. मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धर्माबाबासाठी संघर्ष उभा राहिला पाहिजे होता. पण, तो व्यक्तीगत वैमनस्यासाठी उभा राहतोय हे लाजीरवाणे आहे.

खरेतर हा शतकऱ्यांचा घात आहे. लोकांनी दोघांनाही डोक्यावर घेतले. मतं, पैसाच दिला नाही तर जीवन दिले. घरं-दारं उघडी टाकून माणसं चळवळीत आली. पोलिसांच्या लाठ्या-काठ्या झेलल्या. डोकी फोडून घेतली. या संघर्षात एक दोन कार्यकर्त्यांचे बळीही गेलेत. पोलिसांच्या गोळीबारात स्वत:चा जीवही गमवावा लागला आहे. कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे स्वत:चा जीव देऊन संघटनेला ताकद दिली. असे असताना हे दोन नेते शेतकरी प्रश्नावर सरकारशी लढण्याऐवजी परस्परांच्यात लढत असतील तर हा शेतकऱ्यांशी केलेला द्रोह आहे. ही शेतकऱ्यांशी दगाबाजी आहे. आज सरकारशी दोन हात करण्याची गरज असताना संघटनेची ताकद परस्परांची जीरवण्यासाठीच खर्च होणार असेल तर ते वेदनादायक आहे. स्वत:च्या सुभेदार्या टिकवण्यासाठी कार्यकर्त्यांच्या ताकदीचा केलेला हा गैरवापर आहे. खरेतर दोघांनीही आत्मपरीक्षण करायला हवे. असला प्रकार करताना नक्कीच शरम वाटायला हवी. कोणतेही नेतृत्व उभे राहताना शेकडो लोकांचा त्याग, बलिदान होते. या दोघांना चळवळीने मोठे केले आहे. सुभेदारीच्या हक्कासाठी चळवळ भरकटली जात आहे. याचे दु:ख वाटते.

महत्त्वाचे : ब्लॉगमधील मते ही ब्लॉगरची वैयक्तिक मते आहेत. त्याचा पुढारी वृत्त समूहाशी कोणताही संबंध नाही.