Sun, Aug 18, 2019 20:43होमपेज › Kolhapur › कारखान्याचे मळीमिश्रीत सांडपाणी सावर्डेच्या विहिरीत

कारखान्याचे मळीमिश्रीत सांडपाणी सावर्डेच्या विहिरीत

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 12:04AM

बुकमार्क करा
सावर्डे : वार्ताहर

शरद सहकारी साखर कारखान्याचे दूषित मळीमिश्रीत पाणी सावर्डे गावच्या दक्षिण डोंगर भागातील कारखान्याच्या स्वमालकीच्या विहिरीत सोडण्यात येत आहे. मात्र, या दूषित पाण्याचा प्रादुर्भाव परिसरातील विहिरी, कूपनलिकांना होऊ लागला आहे. परिणामी नागरिकांसह जनावरांचेही आरोग्य धोक्यात येऊ लागले आहे. त्यामुळे कारखान्याकडून सोडण्यात येणारे दूषित पाणी तातडीने थांबवावे; अन्यथा तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा उपसरपंच संजीवनी चौगुले यांच्यासह नागरिकांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

कारखान्याच्या वतीने सावर्डेच्या दक्षिण डोंगर परिसरात जमीन खरेदी करून विहीर खोदण्यात आली आहे. सुरुवातीला शेतीसाठी नदीचे पाणी शेतीसाठी या विहिरीत आणण्यात येणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, या पाईपलाईनमधून कारखान्याचे मळीमिश्रीत दूषित सांडपाणी सोडले जात आहे. याचा परिणाम याठिकाणी असलेल्या वस्तीतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरातील विहिरींमधील मासे मृत्युमुखी पडत आहेत. या पाण्यावर तेलासारखा तवंग निर्माण होत आहे. सध्या येथील नागरिक याच परिसरातील विहिरी व कूपनलिकांचे पाणी पिण्यासाठी वापरतात.

दूषित सांडपाण्यामुळे येथील नैसर्गिक जलस्रोत दूषित होण्याची शक्यता  आहे. नागरिक याप्रश्‍नी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. निवेदनावर परिसरातील शेतकर्‍यांच्या सह्या आहेत. दरम्यान, दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत असेल तर संबंधितांनी पाणी सोडणे बंद करावे; अन्यथा याप्रश्‍नी होणार्‍या आंदोलनात नागरिकांसोबत राहू, असा इशारा सरपंच सुरेखा चव्हाण यांनी दिला आहे.