Wed, Jul 17, 2019 18:48होमपेज › Kolhapur › गावाने नाही; पण रावांनी केली पाणी योजना पूर्ण

गावाने नाही; पण रावांनी केली पाणी योजना पूर्ण

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 15 2018 12:35AMकोल्हापूर : विठ्ठल पाटील

‘गाव करेल ते राव करेल काय’ अशी म्हण रूढ आहे. गावाच्या एकीतून जे काम होईल ते रावसाहेबांच्या म्हणजेच सरकारी यंत्रणेकडून होणार नाही, असा अर्थ दर्शविणार्‍या या म्हणीचा प्रत्यय जिल्ह्यात मात्र उलटा आला. गावातील योजना गावांनीच राबवाव्या आणि ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांच्या देखरेखीखाली उत्कृष्ट काम व्हावे, या शासनाच्या हेतूला हरताळ फासत आपसातील वाद आणि राजकारणातून जिल्ह्यातील जवळपास तीस पिण्याच्या पाणीपुरवठा योजना रखडल्या. त्यापैकी नऊ योजना थेट जिल्हा परिषदेने ताब्यात घेऊन कामे पूर्ण करून तेथे पाणीपुरवठाही सुरू केला.

आर. आर. पाटील (आबा) ग्रामविकासमंत्री असताना त्यांनी ग्रामीण भागात ज्या-ज्या योजनांची कामे केली जातात ती ग्रामपंचायतीनेच करावीत, असा शासन आदेश काढला. त्यानुसार वित्त आयोगापासून ते विविध विकासकामे आणि पिण्याच्या पाणी योजनांची कामेसुद्धा ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत सुरू झाली. या योजनांचा निधी थेट ग्रामपंचायतीला मिळू लागला. गावात स्वच्छता व पाणीपुरवठा समिती स्थापन झाल्या. या समितीच्या अधिकारातच पाणीपुरवठा योजनांची कामे होऊ लागली. समिती अध्यक्ष, सरपंच आणि ग्रामसेवकांच्या नियंत्रणाखाली कामे होत असतानाच काही गावांत स्थानिक राजकारणातून आणि हेवेदाव्यांतून या चांगल्या उपक्रमाला गालबोट लागले. अनेक गावांतील पाणीपुरवठ्याच्या योजना कंत्राटदारांच्या निष्काळजीपणानेही थांबल्या.

कामाचे आदेश प्राप्‍त झाल्यानंतर ठेकेदाराने काम सुरू केले; पण काही गावांत वादावादीचे प्रकार घडले. चांगले काम केले असले, तरी ठेकेदारांवर अविश्‍वास दाखविणे, त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा ठेवणे आणि दोन गटांतील वादातून सतत काम बंद पाडणे अशा प्रकाराने ठराविक गावांतील कामेच थांबली. 

योजनेला निधी मंजूर झाला असताना कामे पूर्ण न होणे आणि गावकर्‍यांना पाणी न मिळणे अशा तक्रारी वाढू लागल्या. हा वाद थेट मंत्रालयापर्यंत पोहोचला. अखेर ज्या गावांतील कामे वादातून थांबली ती जिल्हा परिषदेने ताब्यात घ्यावीत, असे आदेश शासनाकडून दिले गेले. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील नऊ गावांच्या कामाबाबत मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसमोर सुनावणी झाली. त्यातून गावाकडून ही कामे पूर्ण होणार नाहीत, असा निष्कर्ष काढून मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी ही कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर गतीने कामे पूर्ण होऊल संबंधित गावांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत झाला. 

योजना रखडण्याची कारणे अनेक

गावांच्या ताब्यातून काढून जिल्हा परिषदेने केलेल्या कामांची यादी तालुकानिहाय अशी ः करवीर - वडणगे, म्हालसवडे, वडणगे (दलित वस्ती). कागल- म्हाकवे, बानगे. हातकणंगले - माणगाव. शिरोळ - हेरवाड. चंदगड - ढेकोळी. याबरोबरच शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी, लाटवाडी, शिरदवाड, आलास आणि गणेशवाडी या गावांच्या योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग झाल्यानंतर तेथील ठेकेदारांनी कामे न केल्याने त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले. वरील सर्वच गावांतील योजना स्थानिक राजकारणातूनच रखडल्या असे नाही, तर वैयक्‍तिक वाद, भूखंड उपलब्ध न होणे आणि त्यासाठी गावाने प्रयत्न न करणे, अशीही कारणे आहेत. ही कारणे नमूद करूनच तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी शासनास प्रस्ताव पाठवून या योजना गाव पाणीपुरवठा समितीकडून काढून घेऊन जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या ताब्यात दिल्याचे सांगण्यात आले.