Sun, Apr 21, 2019 00:19होमपेज › Kolhapur › पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी रूकडीकरांचा एल्गार

पंचगंगा प्रदूषणप्रश्‍नी रूकडीकरांचा एल्गार

Published On: Jun 02 2018 2:01AM | Last Updated: Jun 01 2018 11:22PM
रुकडी : वार्ताहर

पंचगंगा नदी प्रदूषणविरोधात रूकडीकरांनी शुक्रवारी एल्गार पुकारला. आंदोलनाचे नेतृत्व करणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने यांच्यासह रूकडीकरांनी पंचगंगा नदीत उतरून नदीतील केंदाळाकडे लक्ष वेधले. कार्यकर्त्यांनी केंदाळ हातात घेत पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त कधी करणार? असा सवाल करतानाच या प्रश्‍नी लोकलढा तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला. 

दरम्यान, आंदोलनस्थळी बोलताना धैर्यशील माने यांनी ढिम्म प्रशासनामुळे पंचगंगा विषगंगा बनली आहे. नदीकाठावरील जनतेला शुद्ध पाण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी लढा तीव्र करण्याचा निर्धार बोलून दाखवला.  जिल्ह्याची जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदी सध्या विषवाहिनी बनली आहे. त्यामुळे प्रदूषणमुक्तीच्या लोकलढ्यात सहभागी होण्यासाठी कृती समिती व ग्रामस्थांच्या वतीने शुक्रवारपासून साखळी उपोषणासह गाव बंदची हाक दिली होती. त्या पार्श्‍वभूमीवर सकाळी 10 वाजता चावडी चौक येथे रूकडीसह परिसरातील ग्रामस्थ, महिला, कृती समितीचे पदाधिकारी व स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

ग्रामदैवत राजेबागस्वार  दर्ग्यात प्रदूषण मुक्तीचा संकल्प करून सर्वजण पंचगंगा पात्राकडे गेले. यावेळी आंदोलक हातात लक्षवेधी फलक घेऊन पंचगंगेची करुण कहाणी सांगत होते. कृती समितीचे समन्वयक धैर्यशील माने यांनी सर्वपक्षीयांच्या वतीने मोर्चाचे नेतृत्व केले. त्यांनी पंचगंगा नदीपात्रात उतरून अंगावर  दूषित पाणी व जलपर्णी घेऊन लक्ष वेधले. 

माने म्हणाले, शहरातील विविध नाल्यांमधून नदीत थेट सांडपाणी 
मिसळते. त्यातच कारखाने, उद्योगातून बाहेर पडणारे रसायनयुक्त सांडपाणीही नदीत मिसळत असल्यामुळे प्रदूषण वाढले आहे. शहरवासीयांनी पंचगंगेला केवळ ‘गटारगंगा’  घोषित करण्याचे बाकी ठेवले आहे. त्यांच्या आंदोलनातून काळम्मावाडी धरण, कळंबा तलाव, कृष्णा व वारणा नदीतून शुद्ध पाण्याची तहान भागणार आहे; परंतु पंचगंगा काठावरील गावांना नदीच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. याचे गांभीर्य ओळखून खासदार संभाजीराजे यांनी नदी प्रदूषणमुक्तीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असून, लवकरच केंद्र सरकार नदी प्रदूषण नियंत्रण समितीच्या माध्यमातून निधी मंजूर करणार आहे. तेव्हा पंचगंगा नदी प्रदूषणमुक्तीचा लढा यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी त्यांनी बोलून दाखविला. 

प्रदूषित पाण्यामुळे काठावरील ग्रामस्थांना पोटाचे विकार,  कॅन्सर, साथी व त्वचेचे रोग यांनी ग्रासले आहेत.  पुन्हा  या  आजारावरील उपचारासाठी शहरात दवाखान्यासाठी पैसा खर्च करायचा अशी केविलवाणी अवस्था नदीकाठावर राहणार्‍या ग्रामस्थांची  झाली आहे. त्यामुळे भविष्यात अनेक गावांच्या थेट पाईपलाईनद्वारे धरणातून किंवा विना प्रदूषित नद्यांमधून पाणीपुरवठा विषयी मागण्या वाढू लागल्या आहेत. 

त्यामुळे येथून पुढे प्रदूषण मुक्तीसाठी सर्व पक्षीय एकजुटीची वज्रमूठ बांधणार असल्याची घोषणा माने यांनी केली. रुकडी ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून या जनआंदोलनास उत्स्फूर्त पाठिंबा दिला. 
यावेळी माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, कृती समितीचे समन्वयक धैर्यशील माने, सरपंच  रफिक कलावंत, उपसरपंच शीतल खोत, भगवान जाधव, अभिनंदन खोत, बबलू मकानदार, नंदू शिंगे, आदिनाथ किणिंगे, अमोलदत्त कुलकर्णी आदी उपस्थित होते.