Fri, Apr 26, 2019 03:21होमपेज › Kolhapur › नारळ पोते ५० रुपये अन् पेट्रोल बाटली १० रुपये!

नारळ पोते ५० रुपये अन् पेट्रोल बाटली १० रुपये!

Published On: Aug 18 2018 1:01AM | Last Updated: Aug 18 2018 12:58AMतुरंबे : वार्ताहर

तुरंबे (ता. राधानगरी) येथे 50 रुपयाला मिळते नारळाचे पोते, 10 रुपयाला मिळते पेट्रोलची बाटली!, मात्र असा स्वस्तातला माल घेणार्‍याला गावकर्‍यांनी  पाच हजार रुपये दंडाची तरतूद केली आहे. कारण गावातीलच भुरट्या चोरीतून हे प्रकार पुढे येत आहेत. त्यामुळे हैराण झालेल्या ग्रामस्थांनी हा दंडाचा निर्णय घेतला आहे. काही ग्रामस्थांनी आपल्या दुचाकींना चोरीपासून वाचविण्यासाठी घंटा बांधल्या आहेत. 

तुरंबे गावात गेल्या सहा महिन्यांपासून भुरट्या चोरीत वाढ झाली आहे. फक्‍त दारूसाठी दुचाकीमधील तेल काढणे, नारळ काढणे, मोटारी याचबरोबर ट्रॅक्टर ट्रॉलीतील साहित्याच्या चोरीत वाढ झाली आहे. पेट्रोलची बाटली फक्‍त 10 रुपये दिल्यावर मिळते. तर नारळाचे पोते 50 रुपयाला मिळते. पाण्याची मोटर 100 रुपयाला मिळते, असे साहित्य कमी दरात मिळत असल्याने घेणार्‍यांची संख्याही वाढली आहे. काहीजण तर फक्‍त जेवण देऊन चोरीचा माल घेत आहेत.

काहींनी पेट्रोल कॉकला लॉक केले आहे आणि ज्यांना जागाच नाही अशांनी मात्र शक्‍कल लढवून मोटार सायकलला वायर बांधून ती घरात नेली असून त्याला घंट्या बांधल्या आहेत. मोटारसायकल हलली की घंटा वाजते आणि सर्वजन घरातून धावतच बाहेर येतात. अशा एका प्रकरणातून एक चोरटा सापडला. त्याला बेदम चोपही दिला. अनेक वाहनधारकांनी चोरट्याला रंगेहाथ पकडले, मात्र त्याच्यावर पोलिसांत गुन्हा दाखल करायला कोणीच गेले नाही. त्यामुळे चोरीचे प्रकार सुरूच आहेत.