Thu, Apr 25, 2019 08:09होमपेज › Kolhapur › कोल्‍हापूर : शिरढोण-कुरुंदवाड रस्‍त्यावर वाटमारी

कोल्‍हापूर : शिरढोण-कुरुंदवाड रस्‍त्यावर वाटमारी

Published On: Feb 04 2018 9:52PM | Last Updated: Feb 04 2018 9:52PMकुरूंदवाड : प्रतिनिधी

शिरढोण कुरुंदवाड रस्‍त्यावर पंचगंगा पुलाच्या परिसरात वाटमारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अज्ञात चौघांनी अडवून धक्‍काबुक्‍की करत पैसे व मोबाईल लंपास केल्याची तक्रार इंद्रजित महावीर पाटील (रा. अकीवाट, ता. शिरोळ) यांनी कुरुंदवाड पोलिसांत दिली आहे. यावेळी गुन्‍हेगारांनी त्यांची दुचाकी रस्‍त्याच्या कडेला असणार्‍या खड्‍ड्यात ढकलून देऊन पलायन केले. 

याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, इंद्रजित पाटील व त्याचा मित्र अनिल कागे हे आज पहाटे ५ वाजता सुमारास हीरो स्प्लेंडर मोटारसायकल क्रमांक( एम.एच ०९ सी.बी ७७२० वरून कुरुंदवाड कडे येत असताना पंचगंगा नदी पुलाजवळ अज्ञात चार जणांनी त्यांची दुचाकी अडवून त्यांना धक्काबुक्की केली. तसेच इंद्रजित पाटील यांच्या जवळचा सॅमसंग कंपनीचा पाच हजार रुपये किमतीचा मोबाइल काढून घेतला व मोटारसायकल रस्त्याच्या कडेला खड्डय़ात ढकलून देत पलायन केले.

दरम्यान, महिन्याभरापूर्वी या मार्गावरच या ठिकाणीच रात्री एक वाजता सुमारास कुरूंदवाड येथील युवकाची दुचाकी अडवून त्याचाही महागडा मोबाइल व रोख पाच हजार रुपये रक्कम चोरून नेल्याचा प्रकार घडला होता. या रस्त्यावर होत असलेल्या वाटमारीच्या प्रकारामुळे इचलकरंजीहून कोल्हापूरकडे व्यावसायानिमित्त जाणाऱ्या येणाऱ्या वाहनधारकांतून भीतीचे वातावरण पसरले आहे.