Fri, Mar 22, 2019 06:19
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › कात्यायनी मंदिरात चोरी; सहा तासांत चोरीचा छडा

कात्यायनी मंदिरात चोरी; सहा तासांत चोरीचा छडा

Published On: Sep 13 2018 1:44AM | Last Updated: Sep 13 2018 1:34AMकळंबा : वार्ताहर

येथील नवदुर्गापैकी एक असलेल्या कात्यायनी देवीच्या मंदिरातील मुख्य गाभार्‍याच्या दरवाजाचे कुलूप तोडून संस्थान काळामधील शंभर वर्षांपूर्वीचे देवीचे 60 हजार रुपये किमतीचे चांदीचे  दागिने चोरट्याने लंपास केले. मंगळवारी मध्यरात्री ही घटना घडली.

मंदिरातील सीसीटीव्ही बंद असल्याने देवीचे सर्व अलंकार चोरीस गेले. मंदिराचे पुजारी रामचंद्र गुरव यांनी करवीर पोलिसात फिर्याद दिली आहे. दरम्यान, इचलकरंजी पोलिसांनी सहा ते सात तासांत या चोरीचा छडा लावला असून, सूरज काळे या सराईत चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून मंदिरातून चोरलेले सर्व अलंकार जप्‍त केले आहेत.

कोल्हापूर शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या कात्यायनी मंदिरामध्ये पूर्व-पश्‍चिम बाजूचा लाकडी दरवाजा तोडून चोरट्यांनी प्रवेश केला. देवीच्या गाभार्‍याचे लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडून संस्थान काळामधील दागिने चोरून नेले. त्यामध्ये  22 हजार पाचशे रुपये किमतीचा देवीचा मुखवटा (900 ग्रॅम वजन), बारा हजार पाचशे रुपयेचा देवीचा दुसरा मुखवटा (500 ग्रॅम वजन), 14 हजार 375 रुपये किमतीच्या देवीच्या चौर्‍या (575 ग्रॅम वजन), 3750 रुपये किमतीचे चांदीची धुपारती (वजन दीडशे ग्रॅम) तसेच बाराशे पन्‍नास रुपयाची चांदीची घंटा (वजन पन्‍नास ग्रॅम) असा ऐवज लंपास केला. तसेच मंदिरांमध्ये असलेल्या लोखंडी कपाट कटावणीच्या सहाय्याने  उचकटून सर्व साहित्य विस्कटून टाकले.

करवीर पोलिसांनी बुधवारी सकाळी सात वाजता घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. त्यानंतर सहा ते सात तासात इचलकरंजी पोलिसांनी सुरज काळे या चोरट्याला अटक करून, त्याच्याकडून कात्यायनी देवीच्या मंदिरामध्ये चोरलेले सर्व दागिने हस्तगत केले. अधिक तपास करवीरचे सहायक पोलिस निरीक्षक एस. एस. काळे करत आहेत.