Thu, Apr 25, 2019 11:27होमपेज › Kolhapur › खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवून तरुणाला लुटणारी पुण्याची टोळी जेरबंद

खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवून तरुणाला लुटणारी पुण्याची टोळी जेरबंद

Published On: Jul 26 2018 1:33AM | Last Updated: Jul 25 2018 11:08PMकोल्हापूर : प्रतिनिधी

खेळण्यातील पिस्तुलाचा धाक दाखवून राजारामपुरीतील आठव्या गल्लीत तरुणाला मारहाण करून लुटणार्‍या पुणे येथील सराईत टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणने बुधवारी जेरबंद केले. टोळीकडून सोनसाखळी, दुचाकी, बनावट पिस्तूल हस्तगत करण्यात आले आहे. लुटीतील सोने खरेदी करणार्‍या गुजरीतील सराफाला ताब्यात घेण्यात आले आहे.म्होरक्या सोलोमन ऊर्फ अमित जेम्स चोपडे (वय 25, नाशिक फाटा, पुणे), आकाश राजू गोरखा (26, संतोषीमाता चौक, पिंपरी), इस्माईल रशीद इनामदार (23, अंजुमन चाळ, नेहरूनगर, पिंपरी), वसीम वकील शेख (22, खारवाडी, पिंपरी) अशी त्यांची नावे आहेत.

गुजरीतील सराफ ताब्यात चोरट्याकडून दागिने विकत घेणार्‍या अमृत हरिदास कालेकर (ए. वॉर्ड, दुधाळी) या सराफाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यालाही अटक करण्यात आले, असे ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत यांनी सांगितले. चोपडे, गोरखा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. कासारवाडी, खडक, मानपाडा (मुंबई) पोलिस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल आहेत.

भरचौकातील लुटमारीने थरार

मंगळवार पेठेतील संजय गुरव (खुपेकर गल्ली) हे दि. 20 जुलैला दुपारी कामावर जात असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी पिस्तुलाचा धाक दाखवून, मारहाण करून गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेऊन पोबारा केला होता. राजारामपुरी येथील गजबजलेल्या चौकात भरदिवसा घडलेला लुटमारीचा हा प्रकार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला होता.

फुटेजच्या आधारे संशयितांचा माग राजारामपुरीसह एलसीबीचे पथक चार दिवसांपासून संशयितांच्या मागावर होते. पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र सानप, युवराज आठरे, सचिन पंडित, श्रीकांत मोहिते, इकबाल महात, शिवाजी खोराटे, राजेंद्र हांडे यांंचे पथक फुटेजच्या आधारे संशयितांपर्यंत पोहोचले. पुण्यातील टोळीने लूटमार केल्याचे निष्पन्‍न झाल्यानंतर पहाटे चौघांच्या घरांवर छापे टाकून संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

मित्राच्या भेटीचे निमित्त करून टोळी कोल्हापुरात

संशयित चोपडे हा टोळीचा म्होरक्या आहे. कसबा बावडा येथील सूरज सावंत हा त्याचा मित्र आहे. मित्राला भेटण्याच्या निमित्ताने चोपडे व त्याचे साथीदार वारंवार कोल्हापूरला येत असतात. दि. 30 रोजी ही टोळी येथे आली. सावंत याच्या मालकीची दुचाकी घेऊन टोळीने लूटमार केल्याचे चौकशीत निष्पन्‍न झाले आहे, असेही तानाजी सावंत यांनी सांगितले. टोळीने कोल्हापूर, सांगलीसह पश्‍चिम महाराष्ट्रात अनेक गंभीर गुन्हे केले असावेत असा संशय आहे, असेही सावंत म्हणाले..