Fri, Apr 26, 2019 09:31होमपेज › Kolhapur › ...तर साडेनऊ कोटी जाणार खड्ड्यात !

...तर साडेनऊ कोटी जाणार खड्ड्यात !

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 23 2018 11:35PMकोल्हापूर : सदानंद पाटील

वर्षभर निधीच्या प्रतीक्षेत असलेल्या जिल्हा परिषद सदस्यांना रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी प्रत्येकी 10 लाख रुपये निधी देण्याची घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. रस्ते दुरुस्तीसाठी निधीची घोषणा झाल्यानंतर जिल्हा परिषदेत सदस्य व कंत्राटदारांची धावपळ सुरू आहे. खड्डे भरण्याचे इस्टिमेट सादर करून अनेकांनी बिले सादर करण्याची तयारी सुरू केल्याने खड्डे खरोखरच भरणार की कागदावर, अशी चर्चा जिल्हा परिषेदत सुरू झाली आहे. खड्डे भरण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या नाहीतर साडेनऊ कोटी रुपये खड्ड्यात जाण्याची शक्यता आहे. 

जिल्हा परिषदेत पहिल्यांदाच भाजप व मित्र पक्षांची सत्ता आली आहे. केंद्रात, राज्यात व जिल्हा परिषदेत सत्ता असल्याने चांगला निधी मिळेल, अशी सदस्यांना अपेक्षा होती. त्यामुळे सुरुवातीचे दोन-तीन महिने सदस्यही मोठ्या उत्साहाने जिल्हा परिषदेत येत होते. मात्र, ग्रामस्थांचा विकासकामांसाठी वाढणारा दबाव आणि निधीची कमतरता पाहून सदस्यांनी जिल्हा परिषदेला येणेच टाळले होते. निधी मिळत नसल्याने सत्ताधारी गटातच ठिणगी पडत होती. सत्ताधारी गटाच्या व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपवरही सातत्याने यासंदर्भात पडसाद उमटत होते. या सर्वांची दखल घेत पालकमंत्री पाटील यांनी सदस्यांना निधी देण्याची घोषणा केली. यासाठी जिल्हा नियोजन मंडळात 9 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

यापूर्वी रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी विशेष दुरुस्ती नावाचा कार्यक्रम राबवला जात असे. या कार्यक्रमात अपघातानेच खड्डे भरले जात. ‘खड्डे कागदवर आणि निधी खिशात’ अशी परिस्थिती होती. याच धर्तीवर जिल्हा परिषदेतही खड्डेे भरण्याची तयारी सुरू आहे. ग्रामीण भागातील जनतेचा त्रास कमी करायचा असेल तर प्रत्यक्षात खड्डे भरणे आवश्यक आहे. खड्डे भरण्याच्या कामावर अत्याधुनिक तंत्रज्ञाने नियंत्रण केले तर हे शक्य आहे. यासाठी जिल्हा परिषद व जिल्हा नियोजन मंडळासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

जिओ टॅगिंगचा वापर आवश्यक
केंद्र शासनाच्या प्रत्येक योजनेसाठी आता जिओ टॅगिंग करण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियान, रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, वृक्ष लागवड या ठिकाणी या जिओ टॅगिंगचा वापर करून बोगस कामांना आळा घालण्यात आला आहे. तसेच खड्ड्याबाबतीतही करता येणे शक्य आहे. ज्या रस्त्यावरील खड्डे भरायचे आहेत त्या खड्ड्याचा अंक्षाश,रेखांशासह फोटो घेणे, खड्ड्यााची लांबी, रुंदी व खोली घेणे तसेच हे काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्याचे फोटोग्राफ घेतले तरच खर्‍या अर्थाने खड्डे भरले जातील; अन्यथा विशेष दुरुस्तीप्रमाणेच 9 कोटी 50 लाखांत कागदावरच खड्डे भरले जातील.