Thu, Aug 22, 2019 04:08होमपेज › Kolhapur › प्रेमविवाहाकडे मुला-मुलींचा वाढता कल

प्रेमविवाहाकडे मुला-मुलींचा वाढता कल

Published On: Jan 25 2018 2:03AM | Last Updated: Jan 24 2018 8:54PMइचलकरंजी : प्रतिनिधी

महाविद्यालयात जाऊन येते...मैत्रिणीला भेटून येते.. सांगून घरातून बाहेर पडलेल्या तरुणी घराकडे परततच नसल्याच्या घटनांचा आलेख चढता आहे. त्यावेळी पालकांना जबर मानसिक धक्का बसतो. दोन-तीन दिवस चौकशी करून अखेर ती बेपत्ता असल्याची वर्दी नाईलाजास्तव पोलिस ठाण्यात दिली जाते. काही वेळा सायंकाळीच पोलिस ठाण्यातून दूरध्वनीवरून मुलीने लग्न केल्याची बातमी पालकांना समजते, त्यावेळी पालकांच्या पायाखालची जमीनच सरकते. ज्या मुलींसाठी आयुष्यभर खस्ता खाल्या तिनेच फसगत केल्याने पालकांना समाजातही तोंड दाखवणे मुश्किल होत आहे. 

महाविद्यालयीन युवतीस शाळकरी मुलीचे पळून जाण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. सकाळी महाविद्यालयात जातो, असे सांगून बाहेर पडलेल्या युवती घरी परततच नाहीत. महाविद्यालयात जादा तास असतील, मुलगी अभ्यास करीत असेल किंवा मैत्रिणीच्या घरी गेली असेल, अशी समजूत करून पालक दुपारपर्यंतची वेळ मारून नेतात. मात्र, मुलींचा मोबाईल बंद किंवा नॉट रिचेबल लागला तर मात्र पालकांच्या काळाजाचा ठोकाच चुकतो. एक ना अनेक प्रश्‍न मनात घर करतात. मग तिच्या शोधासाठी धावाधाव सुरू होते. मुलीची जवळची मैत्रीण कोण, तिचा ठावठिकाण काढला जातो आणि नातेवाईक तिच्या घरी पोहोचतात. मात्र, आज मुलगी महाविद्यालयात आलीच नाही, असे उत्तर मैत्रिणीकडून मिळाल्यास पालकांना दिवसा चांदण्या दिसायला लागतात. मग मानसिक समाधानासाठी नातेवाईकांकडे चौकशी केली जाते; पण तिचा काहीच पत्ता न लागल्यास कधीही पोलिस ठाण्याची पायरी न चढणार्‍या पालकांना नाईलाजास्तव ती चढावी लागते. 

पोलिस ठाण्यात गेल्यानंतर मग सुरू होते प्रश्‍नांची सरबत्ती. कधी गेली, कुठे गेली असेल असे एक ना अनेक प्रश्‍नांनी डोके सुन्न होते. तर कधी-कधी येईल वो दोन दिवसांत अशी सूचनाही केली जाते. यापूर्वीचे अनेक अनुभव पाठीशी असलेल्या पोलिसांकडून कधी-कधी मुलीचे प्रेम प्रकरण वगैरे आहे का, असेही विचारले जाते. त्यानंतर सुरू होतो पोलिस तपास. काहीवेळा सायंकाळीच वधू-वर सर्व कागदपत्रांनीशी पोलिस ठाण्यात दाखल होऊन आपण कायदेशीर लग्न केल्याचेही ठणकावून सांगतात. त्यानंतर जात-पात-धर्म आणि आर्थिक परिस्थितीच्या निकषावरून तिचे मतपरिवर्तन करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो. मात्र, मी कोणत्याही परिस्थितीत नवर्‍याकडेच राहणार, या उत्तराने आयुष्यभर लाडात वाढवलेल्या पालकांना अश्रू अनावर होतात. 

मुलगी सज्ञान असल्यामुळे तिला निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचे सांगून पोलिसही कायदेशीर सोपस्कार पूर्ण करतात. अशी एक ना अनेक प्रकरणे गावभाग, शिवाजीनगर आणि शहापूर पोलिस ठाण्यात घडत आहेत. अनेकवेळा अविचारीपणाने घेतलेला निर्णय मुलांच्या अंगाशी आले आहेत. अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्काराचे गुन्हेही अनेकांवर दाखल झाले आहेत. त्यामुळे कायद्याचे अज्ञानही अनेक मुलांच्या करिअरवर गदा आणणारे ठरत आहे. मुलींचे पळून जाण्याचे वाढते प्रमाण मात्र पालकांची चिंता वाढवत आहेत.