Thu, Jul 16, 2020 08:01होमपेज › Kolhapur › तीन चाकावरच जगण : माझा रुबाब हाय अनमोल...

तीन चाकावरच जगण : माझा रुबाब हाय अनमोल...

Published On: Aug 06 2018 1:52AM | Last Updated: Aug 06 2018 12:45AMकोल्हापूर : शेखर दुग्गी 

माझा रुबाब हाय अनमोल... गाण्याच्या पंक्तीप्रमाणे कोल्हापुराच्या शुक्रवार पेठेतील कैलास पाटील यांची एम.एच.एल. 7859 ही इटालियन लॅम्ब्रेडा रिक्षा आजही नवी कोरी वाटावी इतपत सुस्थितीत आहे. कोल्हापुरातील सर्वात जुनी रिक्षा म्हणून तिची ओळख आहे. आजही ती रस्त्यावरून स्वच्छंदीपणे रुबाबात फिरताना दिसते. 

आजच्या काळातील रिक्षांच्या तुलनेत ही रिक्षा अत्यंत वेगळी आहे. कैलास पाटील  यांचे वडील ज्योतिराम विष्णू पाटील त्यावेळी राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरीस होते. काही कारणास्तव त्यांना नोकरी सोडावी लागली. उदनिर्वाहाचे कोणतेही साधन नव्हते, म्हणून त्यांनी रिक्षा व्यवसाय करायचे ठरविले.

18 एप्रिल 1963 साली त्यांनी इटालियन कंपनीची लॅब्रेडा रिक्षा खरेदी केली. 6695 रुपये चेसची किंमत, बॉडी तयार करण्यासाठीचा खर्च मिळवून एकूण 12 हजार रुपये त्यांना रिक्षासाठी खर्च झाला होता. त्याकाळात लॅब्रेडा रिक्षांना मोठी मागणी होती.

लॅब्रेडाची वैशिष्ट्ये...

या रिक्षाची इंजिन क्षमता 175 सीसी असून त्याची पेट्रोल टाकी पुढील बाजूस हॅण्डलजवळ आहे. त्याची क्षमता साडे दहा लिटर आहे. एका लिटरलाही रिक्षा 25 किमी इतकी धावते. रिक्षात असणार्‍या स्पीड मीटरमध्ये एकूण तीन प्रकारची रिडिंग दिसतात.  एक वेग दाखवते, दुसरे किलोमीटर रिडिंग व तिसरे प्रवासासाठीच्या पैशाची माहिती देते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या रिक्षाला शॉक अ‍ॅब्झॉर्व्हर्स नसून संपूर्ण रिक्षाचा भार हा फोर व्हीलरप्रमाणे कमानपट्यावर पेलण्यात आला आहे. तब्बल 900 किलोचे वजन वाहून नेण्याची क्षमता  या रिक्षात आहे. 

रिक्षाला चार गिअर असून रिव्हर्स गिअर पुढील बाजूस आहे. रिक्षाला हॉर्न इटालियन डॅशमो स्टार कंपनीचा आहे. रिक्षासाठी असणारी स्टेपनी टपाच्या वरच्या बाजूस लावली  आहे. रिक्षाची बॉडी आजतागायत चांगली असून त्यावर कोणत्याही प्रकारचा गंज चढलेला नाही. ज्योतिराम पाटील यांचे चिरंजीव कैलास पाटील ही रिक्षा चालवितात. या रिक्षाच्या कमाईवर त्यांनी आणखी दोन रिक्षा विकत घेतल्या आहेत. पाटील हे रिक्षातून कोल्हापूर ते  पुणे असा  प्रवासही अनेकवेळा  करतात.