Mon, Nov 12, 2018 23:25



होमपेज › Kolhapur › उसाच्या ट्रॉलीखाली चिरडून २ मुलांचा अंत 

उसाच्या ट्रॉलीखाली चिरडून २ मुलांचा अंत 

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 24 2018 1:22AM



रेंदाळ : वार्ताहर

रेंदाळ येथे मंगळवारी सायंकाळी उसाने भरलेली ट्रॉली उलटून त्याखाली चिरडून दोघा शाळकरी मुलांचा अंत झाला. यश संतोष शिंगे (वय 15) व साहिल सागर कांबळे (14, दोघे रा. रेंदाळ) अशी त्यांची नावे आहेत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्‍त होत आहे.

हुपरी-इचलकरंजी मार्गावरील वस्तीजवळून उसाने भरलेला ट्रॅक्टर दत्त कारखान्याकडे जात होता. यश व साहिल दुचाकीवरून घरी निघाले होते. रस्ता ओलांडताना ते ट्रॅक्टरच्या आडवे आले. ट्रॅक्टरचालकाने जोरदार ब्रेक मारल्याने उसाने भरलेली पुढची ट्रॉली दोघांच्या अंगावर कोसळली. त्यामध्ये यश व साहिल गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठीकोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयाकडे नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

यश शिंगे हा 9 वीत, तर साहिल हा 8 वीच्या वर्गात शिकत होता. शाळा सुटल्यानंतर मोटारसायकलवरून फेरफटका मारून घरी परतत असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. घटनेनंतर ऊस रस्त्यावर पडल्याने वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी हुपरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे, सरपंच विजय माळी, डी. एस. पाटील व गावातील तरुणांनी धाव घेऊन जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यासाठी तत्परता दाखवली.

यशच्या जाण्याने वडिलांचे स्वप्न भंगले

संतोष शिंगे यांना दोन मुले; पण वडिलांचा यश याच्यावर प्रचंड विश्‍वास होता. यशला अष्टपैलू घडवण्याचे वडिलांचे स्वप्न होते. कराटे स्पर्धेत त्याने राज्यस्तरापर्यंत मजल मारली होती. यशला क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी मारल्याचे वडिलांना पाहायचे होते. मात्र, त्याच्या अकाली जाण्याने वडिलांचे स्वप्न भंगले.