होमपेज › Kolhapur › ज्येष्ठ मल्‍लांना पूर्ववत मानधन द्या

ज्येष्ठ मल्‍लांना पूर्ववत मानधन द्या

Published On: Dec 14 2017 2:18AM | Last Updated: Dec 14 2017 12:14AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ मल्‍लांचे मानधन थांबविणार्‍या अधिकार्‍यांचा धिक्‍कार असो, अशा घोषणा देत शिवसेनेच्या वतीने शिवाजी स्टेडियम येथील जिल्हा क्रीडा कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. कुस्तीपटूंना मानधन मिळवून न देणार्‍या अधिकार्‍यांचा धिक्‍कार करत जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दाराला कुलूप ठोकण्यात आले. त्यानंतर क्रीडा अधिकारी घाटगे यांना निवेदन देण्यात आले. यासंदर्भात तातडीने कार्यवाही करू, असे आश्‍वासन अधिकार्‍यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. 

ज्येष्ठ मल्‍लांना गेली दहा महिने मानधन मिळालेले नाही. याबाबत क्रीडा कार्यालयाकडून कोणत्याही हालचाली सुरू नाहीत. यासंदर्भात अधिकार्‍यांना जाब विचारत शिवसेनेच्या वतीने बुधवारी जिल्हा क्रीडा कार्यालयास टाळे ठोक आंदोलन केले. तसेच अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. 

कुस्तीमध्ये ज्यांनी इतिहास रचला अशा हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप मिळवली अशा ज्येष्ठ पैलवान श्रीपराव खंचनाळे, दीनानाथ सिंह, गणपतराव आंदळकर, हरिश्‍चंद्र बिराजदार, दादू चौगुले, विनोद चौगुले, अमोल बुचडे यांच्यासह अन्य मल्‍लांना शासन दरमहा  6 हजार रुपये मानधन देते. परंतु दहा महिने हे मानधन बंद आहे. उतारवयात  मल्‍लांना  उत्पन्‍नाचे फारसे साधन नसल्याने त्यांना मानधनाचा आधार वाटतो. यामुळे अशा ज्येष्ठ मल्‍लांना शासनाने तातडीने मानधन देण्याचे सुरू करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, रवी चौगुले, अवधूत साळोखे, कमलाकर जगदाळे, राजेंद्र पाटील, रणजित आयरेकर, दिलीप देसाई, धनाजी यादव आदींचा समावेश होता.

जिल्हा क्रीडा अधिकारी गैरहजर

मल्‍लांना मिळणारे मानधन या विषयावर शिवसेनेच्यावतीने बुधवारी टाळे ठोक आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्र देण्यात आले. पण आज जिल्हा क्रीडा अधिकारी माणिक वाघमारे हे अनुपस्थित होते. यावर वाघमारे कोठे गेले. कार्यालयात का थांबले नाहीत, अशी विचारणा आंदोलकांनी केली. पण अधिकारी काहीच उत्तर देऊ शकले नाहीत.