Tue, Mar 26, 2019 11:39होमपेज › Kolhapur › कोल्हापुरातून लवकरच नियमित विमानसेवा

कोल्हापुरातून लवकरच नियमित विमानसेवा

Published On: Jun 08 2018 1:22AM | Last Updated: Jun 08 2018 1:05AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर-मुंबई नियमित विमानसेवा सुरू होईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सकाळी साडेसात वाजता कोल्हापुरातून विमान निघेल व सायंकाळी साडेसहा वाजता ते परत येईल, यासाठीची चर्चा सुरू आहे. नाशिकला असलेला स्लॉट त्यासाठी मिळेल, अशी माहिती खा. धनंजय महाडिक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, देशभरातील खासदारांच्या कामाचे मूल्यमापन करणार्‍या पीआरएस इंडिया या संस्थेसह इतर काही संस्था व संसदरत्न समितीच्या वतीने आपल्याला सलग दुसर्‍यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाल्याचेही त्यांनी सांगितले.

येत्या शनिवारी (ता. 9) आयआयटी, मद्रास येथे केंद्रीय गृह राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत व पश्‍चिम बंगालचे माजी राज्यपाल एम. के. नारायणन, माजी निवडणूक आयुक्‍त टी. एस. कृष्णमूर्ती यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, संसदेच्या कामकाजातील सहभाग, विविध प्रश्‍नांची मांडणी, ती सोडवण्यासाठी केलेला पाठपुरावा आणि नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवण्याची तयारी या निकषावर पीआरएस इंडियासह प्राईम पॉईंट फौंडेशन, प्रो सेन्स या संस्थांकडून या पुरस्काराची निवड केली जाते. मी गेल्या वर्षभरात संसदेत 970 प्रश्‍न उपस्थित केले, 46 चर्चांमध्ये सहभाग घेतला व चार खासगी विधेयके मांडली. त्याचबरोबर संसदेतील माझी उपस्थिती 74 टक्के आहे.

कोल्हापूर-बिदर रेल्वे

ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मला संधी द्या, मी हजार कोटीचा निधी आणतो, असे आश्‍वासन दिले होते. हा टप्पा केव्हाच ओलांडला आहे. कोल्हापूर-वैभववाडी मार्गासाठी 3500 कोटी, विमानतळ विस्तारीकरण व विमानसेवा सुरू करण्यासाठी 274 कोटी, रेल्वे स्टेशनसाठी 20 कोटी, बीएसएनएलच्या 130 टॉवरची उभारणी, मतदार संघातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सहकार्याने 408 कोटी रुपयांचा निधी आणला. याशिवाय बास्केट ब्रिजच्या कामाची निविदाही प्रसिद्ध झाली असून, ऑगस्ट महिन्यात या कामाची वर्क ऑर्डर निघेल. कोल्हापूर-बिदर रेल्वे 13 जूनपासून सुरू होणार आहे.
चांगल्या कामामुळेच
भाजपची मंत्रिपदाची ऑफर
प्रत्येक पक्षाला चांगल्या लोकप्रतिनिधीची आवश्यकता असतेच, या भावनेतूनच भाजप नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मला मंत्रिपदाची ऑफर दिली आहे, हा कोल्हापूरचा बहुमान आहे, असे मत महाडिक यांनी यावेळी व्यक्‍त केले.

माझ्या उमेदवारीचा निर्णय पक्षाध्यक्ष शरद पवार घेतील. आ. हसन मुश्रीफ हे जिल्ह्याचे आमच्या पक्षाचे नेेते आहेत, त्यांची भूमिकाही महत्त्वाची असल्याचे महाडिक यावेळी म्हणाले. एखाद्या पक्षाची भूमिका काय आहे, हे मला सांगता येणार नाही. निवडणुका जाहीर झाल्यानंतर पक्षांच्या भूमिकाही स्पष्ट होतील, असे त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.

संसद आदर्श ग्राम योजना चांगली आहे; पण निधीअभावी खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावांत या योजनेची कामे दिसत नाहीत. खासदारांना वर्षाला पाच कोटींचा निधी मिळणार, त्यापैकी एक कोटीचा निधी एकाच गावावर खर्च करणे शक्य नाही. या निधीत 20 ते 25 गावांतील कामे करता येतात. त्यामुळे या योजनेतील गावांत काम दिसत नाही. राज्य व केंद्र शासनाने अशा गावांसाठी स्वतंत्र निधी देण्याची गरज असल्याचे महाडिक यांनी सांगितले.