Tue, Apr 23, 2019 14:27होमपेज › Kolhapur › आता दस्त नोंदणी ‘ऑनलाईन’

आता दस्त नोंदणी ‘ऑनलाईन’

Published On: Sep 12 2018 1:48AM | Last Updated: Sep 12 2018 1:23AMशिरगाव : वार्ताहर 

जमीन, जागा, घर खरेदी केल्यानंतर नोंदणीसाठी आता तहसील कार्यालय व तलाठ्यांकडे हेलपाटे मारण्याची गरज नाही. दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नोंदणी कार्यालयामार्फत थेट तलाठ्यांच्या ऑनलाईन डेस्कला दस्ताची माहिती व संबंधित कागदपत्रे पाठवण्यात येणार आहेत. त्यावर तलाठ्यांनी पंधरा दिवसांत फेरफार अर्थात खरेदी केलेल्या व्यक्‍तीच्या नावाची नोंद करावी लागणार आहे.

राष्ट्रीय भूमिअभिलेख कार्यलयातील राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी सर्व जिल्हाधिकार्‍यांना यासंबंधीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. जमीन, जागा अथवा घर खरेदी केल्यानंतर नावाची नोंद करणे जिकिरीचे ठरते. त्यासाठी तलाठी मंडल अधिकारी यांच्याकडे संबंधितांना हेलपाटे घालावे लागत होते. शासनाने 2013 मध्ये प्रत्येक तहसील कार्यालयात फेरफार कक्ष सुरू केला होता. या फेरफार कक्षाकडे दुय्यम निबंधक कार्यलयांकडून कागदपत्रे पाठवण्यात येत होती. त्यावर संबंधित तहसीलदारांच्या डेक्सवरून नोंदणीकृत दस्त तलाठ्याकडे नोंदीसाठी पाठवण्यात येत होता.

ही प्रक्रिया नुकतीच बंद करण्यात आली असून, त्यामुळे संबंधित खरेदीदारांच्या वेळेचीही बचत होणार आहे. शिवाय, तहसीलदारांवरील कामाचा ताणही कमी होणार आहे. शासनाने आदेश देताना ई-फेरफार प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी दुय्य्म निबंधक कार्यालयातून प्राप्त होणार्‍या नोंदणीकृत दस्त माहितीवर प्रक्रिया करून फेरफार तयार करण्यासाठी व फेरफाराची नोटीस (नमुना 9) तयार करून संबंधितांना बजावण्याच्या उद्देशाने तहसीलदार कार्यलयात फेरफार कक्ष तयार केला होता. त्यामध्ये बदल करून हा टप्पा कमी करण्यात आला आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातून प्राप्त नोंदणीकृत दस्तांची माहिती संबंधित तलाठ्याच्या लॉगइनला थेट प्राप्त होणार आहे. त्यावर संबंधित तलाठी योग्य ती कारवाई करून फेरफार घेण्याची प्रक्रिया करावी लागणार आहे.

तलाठ्यांना 15 दिवसांची डेडलाईन 

तलाठ्यांनी 15 दिवसांत संबंधित खरेदी केलेल्या व्यक्‍तीचे नाव उतार्‍यावर लावणे बंधनकारक आहे. तांत्रिक अडचण नसताना 15 दिवसांच्या मुदतीत नोंद न केलेल्या प्रलंबित नोंदीची माहिती तहसीलदार, प्रांताधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांना दिसणार आहे, अशी माहिती महसूल विभागातून देण्यात आली.