Tue, Jul 16, 2019 21:50होमपेज › Kolhapur › गळती काढल्यास वर्षाला 34 कोटींची बचत

गळती काढल्यास वर्षाला 34 कोटींची बचत

Published On: Apr 22 2018 1:16AM | Last Updated: Apr 21 2018 11:29PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

कोल्हापूर शहरात 40 ठिकाणी जलवाहिनीला गळती लागली आहे. त्यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. मोठ्या 7 ते 8 गळती काढण्यासाठी 1 कोटी 7 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. शहरातील एकूण पाण्याच्या सर्व गळती काढल्यास वर्षाला सुमारे 34 कोटी रु. वाचतील, असे स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच सर्व गळती काढून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांना दोन वर्षाचे टार्गेट देण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक ईश्‍वर परमार, वैभव माने उपस्थित होते.

महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या आकडेवारीनुसार, दररोज 154.8 एमएलडी पाण्याचा उपसा केला जातो. त्यातील फक्‍त 58.46 एमएलडी म्हणजे 38 टक्के पाण्याचे बिलिंग होऊन पाणीपट्टी जमा होते. उर्वरित 95.62 एमएलडी म्हणजे 62 टक्के पाण्याचा हिशेबच लागत नाही. परिणामी, 62 टक्के पाणी हे पाणी गळती व चोरी होत असल्याचे स्पष्ट होते. गळतीतून जाणारे पाणी शुद्ध करण्यासाठी रोज सुमारे 3 लाख 70 हजार इतका खर्च येतो. ती रक्‍कम बुडीत खात्यात जमा होते. त्या पाण्याची लिटरची किंमत 9 ते 15 रु. अशी आहे. त्यामुळे वर्षाला सुमारे 17 लाख 34 हजार ते 34 कोटींपर्यंतची रक्‍कम वाया जात आहे, असेही ढवळे यांनी सांगितले. 

ते म्हणाले, शहरातील ए, बी, सी व डी वॉर्डांत एकूण 58 हजार नळ कनेक्शन म्हणजेच 62 टक्के इतके ग्राहक आहेत. ई वॉर्डात 34 हजार 500 नळ कनेक्शनधारक असून, त्याची टक्केवारी 38 आहे. ए, बी, सी व डी वॉर्डांत एकूण 112 एमएलडी पाणीपुरवठा होतो. तर ई वॉर्डाला फक्‍त 41.8 एमएलडी पाणी मिळते. टक्केवारीनुसार ई वॉर्डाला 38 टक्के पाणी मिळायला पाहिजे. परंतु, फक्‍त 27 टक्के पाणी मिळत आहे. त्यामुळे ई वॉर्डाला वारंवार पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, वॉटर ऑडिट रिपोर्टनुसार तब्बल 195 एमएलडी पाण्याचा रोज उपसा होतो. 136 एमएलडी पाण्याची गळती होते, असेही ढवळे यांनी सांगितले. 

Tags : Kolhapur,  reduction, leakage, 34, crores, savings, per, year