Thu, Jul 18, 2019 02:40होमपेज › Kolhapur › रोजंदारी कामगाराला ऑर्डर आणि 15 हजार पगार

रोजंदारी कामगाराला ऑर्डर आणि 15 हजार पगार

Published On: Jul 07 2018 2:05AM | Last Updated: Jul 07 2018 1:35AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

रोजंदारी कामगार म्हणून गेल्या पंधरा वर्षांपासून राबणा़र्‍या कामगाराला दोन वर्षांची ऑर्डर आणि 15 हजार फिक्स पगार तर नव्याने भरती करण्यात येणार्‍यांपैकी ज्यांनी व्यवहार पूर्ण केला, त्यांना कायमची ऑर्डर या पद्धतीने जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात (गोकुळ) जम्बो नोकरभरती सुरू आहे. या नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून संघाच्या गोकुळ शिरगाव कार्यालयात उमेदवारांची झुंबड उडाली आहे. 

संघाची दोन वर्षांनंतर होणारी निवडणूक डोळ्यापुढे ठेवून मोठ्या प्रमाणात कर्मचारी भरती सुरू केली आहे. संघाचे नेतृत्त्व करणा़र्‍या नेत्यांपासून ते संचालकांना त्यांच्या ज्येष्ठतेनुसार जागांचा वाटप केल्याचे समजते. सुमारे 400 कर्मचा़र्‍यांची भरती करण्यात येणार आहे. अर्थात या भरतीमागेही अर्थकारण दडले आहे. सुरुवातीला या भरतीला कर्मचारी संघटनेने विरोध केला, त्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली; पण त्यांच्याशी वेतनवाढ करार करून हा विषय संपवून टाकला. त्यानंर रोजंदारी कर्मचारी म्हणून सुमारे 200 ते 250 जण गेल्या पंधरा वर्षांपासून काम करतात. हे कर्मचारी आंदोलन करतील म्हणून त्यांना दोन वर्षांची प्रोबेशन ऑर्डर तर 15 हजार रुपये पगार दिला गेला. पूर्वी या कर्मचा़र्‍यांना दिवसाला 275 पगार होता. दोन प्रमुख घटकांचा विरोध थंड केल्यानंतर गेल्या आठवडाभरापासून नव्या भरतीची प्रक्रिया वेगाने सुरू आहेत.

नव्या भरतीत संघाचे मतदार असणार्‍या ठरावदारांची मुले किंवा त्यांचे जवळचे नातेवाईक आहेत. दोन वर्षांपूर्वीच त्यांच्याशी यावर अर्थपूर्ण चर्चा झाली आहे. काहींचे व्यवहारही पूर्ण झाले आहेत. नेत्यांपासून ते संचालकांपर्यंत प्रत्येकाला किती कर्मचारी याचा कोटा ठरल्याने ‘तेरी भी चूप मेरी भी चूप’ या माध्यमातून ही भरती सुरू आहे. विशेष म्हणजे 20 जून रोजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी या भरतीला स्थगिती दिली आहे. हा आदेश डावलून ही भरती सुरू असल्याने त्याची मोठी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू आहे. या भरतीवरून आता पुन्हा एकदा संघाचे नेते  माजी आमदार महादेवराव महाडिक व काँगे्रसचे आमदार सतेज पाटील यांच्यातील संघर्ष उफाळून येणार आहे. 

नोकर भरती चुकीची - आ. सतेज पाटील
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) मध्ये नोकर भरतीची जी प्रक्रिया सुरू आहे, ती अत्यंत चुकीची आहे. कारण गोकुळमधील नोकरभरतीला दूग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनी स्थगिती दिली आहे. तसेच या आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, असे गोकुळला दिलेल्या आदेशात म्हटले आहे. तरीही गोकुळने नोकर भरती प्रक्रिया सुरू केली आहे; पण हे सर्व बेकायदेशीर आहे. तेव्हा इच्छुक उमेदवारांनी गोकुळमध्ये भरतीसाठी प्रयत्न करू नयेत, कोणाशीही आर्थिक व्यवहार करू नयेत. यापुढे गोकुळने नोकर भरती केलीच तर हा प्रश्‍न उच्च न्यायालयात जाणार आहे, तेव्हा इच्छुक उमेदवारांनी याची आताच गंभीर दखल घ्यावी, असे आ. सतेज पाटील यांनी सांगितले.

भरती नियमानुसारच - विश्‍वास पाटील
संघातील ही भरती यापूर्वीच झाली आहे, ती नियमानुसारच झाली असून, त्याची फक्त प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याचे संघाचे अध्य्क्ष विश्‍वास पाटील यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्‍नांवर बोलताना सांगितले. 

जिल्हा बँकेप्रमाणे ऑनलाईऩ भरती करा - आमदार हसन मुश्रीफ
याबाबत राष्ट्रवादी काँगे्रसचे आमदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ज्याप्रमाणे जिल्हा बँकेतील नोकर भरतीला चाप लावण्यासाठी सरकारनेही भरती ऑनलाईन पद्धतीने एखाद्या कंपनीकडून करण्याचे आदेश काढले, त्याच धर्तीवर जिल्हा पातळीवरील संस्थांची भरती झाली पाहिजे. सरकारने सर्वच संस्थांतील ही भरती ऑऩलाईन पद्धतीने करावी.