Tue, Jul 23, 2019 06:16होमपेज › Kolhapur › जिल्हा परिषदेत रुजतेय वाचन संस्कृती

जिल्हा परिषदेत रुजतेय वाचन संस्कृती

Published On: Jun 25 2018 1:48AM | Last Updated: Jun 24 2018 11:57PMकोल्हापूर : विकास कांबळे

जिल्हा परिषदेत सुरू करण्यात आलेल्या ग्रंथालयाला अपेक्षेपेक्षा अधिक चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता ई-लायब्ररी सुरू करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. ग्रंथालयातील पुस्तकांची संख्या आणखी वाढविण्यासाठी सभासद, कर्मचार्‍यांकडून काही नाममात्र रक्‍कम स्वीकारण्याचा विचारही प्रशासन करत आहे.

माध्यमांचे स्वरुप बदलत गेले तसे  नागरिकांच्या अभिरुचीही बदलत गेल्या. एक काळ असा होता सार्वजनिक वाचनालयाच्या ठिकाणी सकाळपासून वृत्तपत्र वाचण्यासाठी गर्दी असे. सर्वच लोकांना पुस्तके विकत घेऊन वाचने शक्य नव्हते. त्यांच्यासाठी ग्रंथालयाची संकल्पना पुढे आली. पुस्तकांबरोबरच मासिक, साप्‍ताहिक, दिवाळी अंक देखील याठिकाणी मिळत असत. त्यामुळे ग्रंथालयाचा व्यवसाय देखील काही काळ भरभराटीचा होता. देशात खासगीकरण घुसले आणि सर्व संकल्पना झपाट्याने बदलल्या. माहितीचे आगार सुरुवातीला नागरिकाच्या घरात आले. त्यानंतर ते आता हातात आले.   त्यामुळे कोणतीही माहिती असो अथवा एखादे पुस्तक  कोणत्याही ठिकाणी ते वाचण्यासाठी सहज उपलब्ध होऊ लागले. हळूहळू ग्रंथालये बंद होऊ लागली. जातांना रस्त्यावर हमखास दिसणारी ग्रंथालये आत शोधण्याची वेळ आली आहे. त्यामुळे ग्रंथालय चळवळ शासनाला हाती घ्यावी लागली. गावोगावी ग्रंथालये सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

कोल्हापूर जिल्हा परिषद नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात कायम आघाडीवर असते. या जिल्हा परिषदेत राबविण्यात आलेले अनेक उपक्रम पुढे शासनाने राज्य पातळीवर राबविण्यास सुरुवात केली आहे. ग्रंथालय सुरू करण्याची संकल्पना तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांची. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिला. ग्रंथालय सुरू करताना नेहमीप्रमाणे हे किती दिवस चालणार? पुस्तक वाचायला  कोणाला वेळ आहे? काम करावे की पुस्तके वाचावीत, असा विरोधाचा सूर निघाला. जिल्हा परिषद कर्मचार्‍यांची मानसिकता पाहता ग्रंथालयाबाबत अशा प्रतिक्रिया व्यक्‍त होणे स्वाभाविक आहे. मात्र, असे म्हणणार्‍यांना दोन वर्षांत ग्रंथालयाला मिळालेला प्रतिसाद चपराक देणारा आहे.

1 जून 2016 रोजी डॉ. ए. पी.  जे अब्दुल कलाम यांच्या नावाने ग्रंथालय सुरू करण्यात आले. सुरुवातीला केवळ 400 पुस्तके होती. पहिली सात, आठ महिने याला अतिशय कमी प्रतिसाद मिळाला. त्यानंतर स्पर्धा परीक्षेची पुस्तके खरेदी करण्यात आली. याशिवाय  चांगल्या लेखकांची पुस्तके वाढविण्यात आली. त्यानंतर मात्र कर्मचार्‍यांची संख्या वाढू लागली. कर्मचारी पुस्तकांची नावे सांगू लागली, ती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न प्रशासन करू लागले. पुस्तक जमा करण्याच्या आवाहनासही प्रतिसाद मिळू लागला. पुस्तक नेणार्‍यांच्या संख्येत दिवसंदिवस वाढच होत आहे. आतापर्यंत साधारणपणे दीड हजार पुस्तकांची देवाण, घेवाण झाल्याची नोंद आहे. पुस्तकांची संख्याही साधारणपणे साडेतीन हजारांवर गेली आहे. यात रोज वाढच होत आहे. ग्रंथालयासाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्‍त करण्यात आला आहे. पुर्वी याठिकाणी श्री. लोंढे काम पाहत होते. अतिशय मन लावून, वेळ देत त्यांनी ग्रंथालयाची उभारणी केली आहे. ग्रंथालयाला कर्मचार्‍यांचा मिळणारा प्रतिसाद पाहून ई-लायब्ररी सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भात लवकरच सादरीकरण करण्यात येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ यांनी सांगितले.

ग्रंथालय अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न

जिल्हा परिषदेत  सुरू करण्यात आलेल्या ग्रंथालयाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे ग्रंथालय अद्ययावत करण्यात येणार आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठ किवा महाविद्यालयातील ग्रंथपाल यांच्याशी चर्चा करण्यात येईल. त्यांच्या मार्गदर्शनानुसार लवकरच आराखडा तयार करण्यात येणार आहे. ग्रंथालयात पुस्तकांची संख्या वाढविण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. याला नागरिकांनीही सहकार्य करावे. वाचून झालेली पुस्तके नागरिकांनी जिल्हा परिषदेकडे जमा करून, या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष शौमिका महाडिक व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.