Wed, May 22, 2019 14:21होमपेज › Kolhapur › शिवछत्रपती-ताराराणी रथोत्सव शाही थाटात(व्हिडिओ)

शिवछत्रपती-ताराराणी रथोत्सव शाही थाटात(व्हिडिओ)

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

रंगीबेरंगी फुलांच्या माळांसह नेत्रदीपक विद्युत रोषणाईने सजविलेला  रथ, सभोवती पारंपरिक वेशभूषेतील मानकरी, शिवछत्रपती-ताराराणी यांचा अखंड जयघोष करत रथ ओढणारे शेकडो शिवभक्त, इतिहासप्रेमी, पारंपरिक वेशभूषेत घोड्यावर स्वार बालचमू आणि ढोल-ताशा पथकांचा दणदणाटासह हलगी-घुमके-झांज आदी पारंपरिक वाद्यांच्या साथीने सुरू असणारा शिवकालीन युद्धकलेचा थरार अशा उत्साही वातावरणात सोमवारी रात्री शिवछत्रपती व रणरागिणी ताराराणी यांचा रथोत्सव झाला. मध्यरात्रीपर्यंत सुरू असणारा हा रथोत्सव पाहण्यासाठी आबालवृद्धांनी पारंपरिक मार्गावर मोठी गर्दी केली होती. 

जुना राजवाडा येथील तुळजाभवानी मंदिरासमोरील भवानी मंडपातून रथोत्सवाची सुरुवात शाहू महाराज, मालोजीराजे, आमदार राजेश क्षीरसागर,  शहाजीराजे, यशराजराजे यांच्या हस्ते पूजनाने झाली. यावेळी सर्व जाती-धर्मांतील प्रतिनिधी, संस्था, संघटना, तालीम संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भवानी मंडप, बालगोपाल तालीम, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महाद्वार रोड, गुजरी, भाऊसिंगजी रोडमार्गे जुना राजवाडा असा रथोत्सवाचा मार्ग होता. संपूर्ण मार्ग नेत्रदीपक लेझर किरणांनी  दीपून गेला होता. आकाश उजळून टाकणारी आतषबाजी, फुलांची उधळण आणि सप्तरंगी रांगोळ्यांसह फुलांच्या पायघड्या घालून व औक्षण करून रथाचे स्वागत करण्यात आले. तालीम संस्था, तरुण मंडळांच्या वतीने चौकाचौकांत रथाचे जंगी स्वागत करण्यात आले. जागोजागी शिवछत्रपतींचे पुतळे पूजण्यात आले होते. डिजिटल फलकांवरून रथोत्सवाला शुभेच्छांसह सामाजिक संदेशही देण्यात आले होते. रथोत्सवात सहभागी पथकांसाठी पाणी-सरबत यांची व्यवस्थाही लोकांनी उत्स्फूर्तपणे केली होती. रथोत्सवात सहभागी करवीर गर्जना व रणांगण झांजपथक यांचा सहभाग होता. 

अलोट गर्दी 
 रथोत्सवाच्या पारंपरिक मार्गावर नागरिकांनी दुतर्फा मोठी गर्दी केली होती. लहान मुले-मुली, तरुण-तरुणींसह ज्येष्ठ नागरिक रयतेचा राजा आणि रणरागिणी ताराराणी यांना मानाचा मुजरा करण्यासाठी आवर्जुन उपस्थित होते. 

मार्गावर काढलेल्या रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या, आतषबाजी, सजविलेला रथ, फुले, रांगोळी, भगवे ध्वज यांनी सजलेले रस्ते आणि रथोत्सवाला झालेली गर्दी याची छायाचित्रे टिपण्यासाठी कॅमेरे, मोबाईल, सेल्फी स्टीक घेऊन सरसावत होते. चौकाचौकांत रथाचे स्वागत होत होते. सिस्टिमवर पोवाडे, पारंपरिक स्फूर्ती गीते, वाद्यांचा गजर आणि जयघोषाने विशेष वातावरण निर्मिती झाली होती.
Tags :  kolhapur, rathousav,  Shiv Chhatrapati, Ranaragini Tararani


  •