Thu, Jun 27, 2019 14:33होमपेज › Kolhapur › भोगावती साखर कारखान्यातील कारभाराच्या चौकशीचा ससेमिरा

भोगावती साखर कारखान्यातील कारभाराच्या चौकशीचा ससेमिरा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

राशिवडे : प्रतिनिधी

काँग्रेसने 2011 ते 2013 च्या भोगावती साखर कारखान्यातील कारभाराच्या चौकशीची मागणी केल्यानंतर आता राष्ट्रवादीनेही काँग्रेस सत्ताकाळातील 2000 ते 2010 दरम्याच्या कालावधीतील कारभाराच्या चौकशीच्या मागणीसाठी  उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. यावर दि. 30 नोव्हेंबरला सुनावणी आहे.  

मागील वेळी काँग्रेसने सत्ता गेली म्हणून 2011-13 दरम्यानच्या राष्ट्रवादी-शेकाप सत्ताकाळातील कारभाराच्या चौकशीची मागणी साखर सहसंचालकांकडे एप्रिल 2014 मध्ये केली. साखर सहसंचालकांनी या मागणीची दखल घेतली नाही म्हणून ऑगस्ट 2014 मध्ये ही मागणी उच्च न्यायालयामध्ये करण्यात आली. त्यानंतर चौकशीचे आदेशही निघाले. साखर सहसंचालकांनी के. बी. तेलंग यांची चौकशीसाठी नियुक्ती केली. परंतु, तेलंग यांनी ही चौकशी करण्यास नकार दिला.

तोपर्यंत राष्ट्रवादीने सप्टेंबर 2015 मध्ये या चौकशीस स्थगिती आणली. परत जानेवारी 2017 मध्ये काँग्रेसने स्थगिती उठवली. पुन्हा सेवानिवृत्त सहायक निबंधक एस. बी. चौगले यांची चौकशीसाठी नियुक्ती झाली. चौकशीमध्ये कोट्यवधी रुपयांचा तोटा झाल्याचे स्पष्ट झाले. शासकीय लेखापरीक्षकांनी तर साखर विक्री, मोलॅसिस, बगॅस विक्रीसह बारदान खरेदी आदी बाबींवर शेरेही मारले आहेत. चौगलेंनी चौकशी अहवाल वरिष्ठांकडे पाठविला असून, या अहवालाचा अभ्यास केल्यानंतरच नेमकी कारवाई काय होणार? हे समजणार आहे. आता राष्ट्रवादीने काँग्रेस सत्ताकाळातील म्हणजेच 2000 ते 2010 मधील कारभाराच्या चौकशीची याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केली आहे.