Mon, Mar 18, 2019 19:16होमपेज › Kolhapur › पर्यटकांना साद घालतोय रांजण धबधबा

पर्यटकांना साद घालतोय रांजण धबधबा

Published On: Aug 07 2018 12:59AM | Last Updated: Aug 06 2018 11:35PMपुनाळ : संग्राम पाटील

उंचच्या उंच डोंगर रांगा, सभोवतालचा हिरवागार निसर्गरम्य परिसर, त्यामधील अनेक प्रकारची झाडे, वेली आणि ऐकू येणारा पक्षांचा किलबिलाट, दाट धुके, अधूनमधून पावसाच्या अंगावर येणार्‍या सरी, त्याचबरोबर अंगाला झोंबणारा थंडगार वारा. नागमोडी वळणाची वाट, सरळ उभा डोंगराचा कडा आणि त्यामधून जवळ-जवळ दोनचे फूट खाली कोसळणारा सोनुर्ले (ता. शाहूवाडी) येथील रांजण धबधबा पर्यटकांना पावसाळी पर्यटनासाठी खुणावत आहे. जास्त प्रमाणात प्रसिद्ध नसणारा पण बारमाही पाणी असणारा हा धबधबा त्याच्या निसर्ग सौंदर्यामुळे आणि देखण्या रूपामुळे पाहण्यासाठी खूपच आकर्षक आहे. धबधब्याजवळ जाताच अंगावर उडणारे पाण्याचे तुषार मन मोहून टाकतात.

कोल्हापूरपासून पंचेचाळीस किलोमीटरवर असणार्‍या या धबधब्यास वर्षा पर्यटनासाठी जाण्यास काहीच हरकत नाही. कोल्हापूर-कोतोली फाटा-आसुर्ले-पोर्ले-कोतोली-नांदगाव-सोनुर्ले-पाटीलवाडी असा हा मार्ग आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असलेने धबधब्यापर्यंत जाणारा रस्ता बंद आहे. त्यामुळे धबधब्यापर्यंत कोणतेही वाहन नेता येत नाही. सोनुर्ले पैकी पाटीलवाडी येथे वाहन लाऊन धबधब्याकडे जावे लागते. धबधब्याकडे जाणारी वाट दाखवनेसाठी तेथील एखादा वाटाड्या घेऊनच तिकडे जाने योग्य ठरते. यासाठी तेथील ग्रामपंचायतीचे सरपंच राजेंद्र पाटील सर्व सदस्य व स्थानिक लोक मदत करतात.

रांजण धबधबा नाव पडण्यामागे स्थानिक लोक एक वैशिष्ट सांगतात, ते म्हणजे धबधबा ज्या ठिकाणी कोसळतो त्या ठिकाणी रांजणासारखा 10 ते 15 फूट खोलीचा डोह आहे. त्यास रांजणडोह तर धबधब्यास रांजण धबधबा असे नाव प्रचलित झाले. धोंडेवाडी व भैरेवाडी या दोन ठिकाणांवरून वाहत येणार्‍या दोन वेगवेगळ्या ओढ्यांचा येथे संगम होऊन धबधबा तयार झाला आहे.

या परिसरात आणखी बरेच छोटे-मोठे धबधबे पाहावयास मिळतात. सर्व धबधब्याचे पाणी एकत्र होऊन पुढे हा पाण्याचा प्रवाह मनकर्णिका नदीला जाऊन मिळतो. सध्या याचठिकाणी सोनुर्ले लघुपाटबंधारे प्रकल्प साकारला जात आहे. 46 कोटींचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांतच याठिकाणी राज्य व राज्याबाहेरील पर्यटकांना पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे.